‘स्पा’च्या नावाखाली देहव्यापाराचा अड्डा, दोन दलालांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 02:43 PM2023-08-18T14:43:24+5:302023-08-18T14:43:56+5:30
गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : छावणी परिसरातील एका हॉटेलमध्ये देहव्यापाराचा अड्डाच बनविण्यात आला होता. ‘स्पा’च्या नावाखाली बाहेरून मुली- महिला आणून त्या आंबटशौकिन ग्राहकांना पुरविण्यात येत होत्या. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने या रॅकेटचा भंडाफोड करत दोन दलालांना अटक केली आहे.
सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल सिटीस्केप येथे ‘स्पा’ चालविण्याच्या नावाखाली महिला व मुलींकडून देहव्यवसाय करवून घेण्यात येत होता. याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. बुधवारी पोलिसांनी सापळा रचून बोगस ग्राहक हॉटेलमध्ये पाठविले. तेथे सौदा झाला व बनावट पंटर आतमध्ये गेले. तेथून त्यांनी इशारा दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने धाड टाकली.
हॉटेलच्या दोन खोल्यांमध्ये दोन महिला होत्या. पोलिसांनी पूर्ण हॉटेलची झडती घेतली असता स्वयंपाकघरात चार महिला बंद करण्यात आल्याचे आढळले. पोलिसांनी सर्वांची झाडाझडती घेतली असता पिंकी उर्फ दिया ही महिला स्पा चालवत असल्याची बाब समोर आली. तीच ग्राहकांकडून पैसे घ्यायची. तर कमलेश गजानन कटकमवाड (४२, मानेवाडा) व प्रदीपकुमार ठाकूर कुशवाह (२८, सलीमपूर, उत्तरप्रदेश) या दलालांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या तिघांसोबतच हॉटेलमालक ओम उर्फ अविनाश कमद याच्यावरदेखील गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हॉटेलमधून एकूण सहा मुली- महिलांची सुटका केली. आरोपींकडून ६१ हजार रोखीसह १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबूराव राऊत, रेखा संकपाळ, गणेश पवार, गजानन चांभारे, राजेश तिवारी, दीपक बिंदाने, कमलेश गणेर, मनिष पराये, सुरेश तेलेवार, विवेक श्रीपाद, अश्विनी खोडपेवार, शरीफ शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गरीब मुली- महिलांना करायचे टार्गेट
पिंकी तसेच तिच्यासाठी काम करणारे दोन्ही दलाल हे गरीब कुटुंबातील मुली व महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारात ओढायचे. अनेक काळापासून स्पाच्या नावाखाली हा प्रकार सुरू होता. प्रदीपकुमार ठाकूर कुशवाह हा उत्तरप्रदेशातील होता व उत्तर भारतातूनदेखील त्याने काही मुली- महिला ग्राहकांना पुरविल्या होत्या. मुली- महिला कुठेही पळून जाऊ नये, यासाठी त्यांना स्वयंपाकघरात ठेवण्यात येत होते. तसेच त्यांच्यावर दोन्ही दलालांची सतत नजर असायची.