नागपुरात पॉश हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय; संचालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 10:11 PM2021-10-08T22:11:20+5:302021-10-08T22:11:54+5:30
Nagpur News पॉश हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने जेरबंद केले. आकाश बुधारू साहू (वय २८) असे त्याचे नाव आहे. तो जयताळ्यातील एकात्मता नगरात राहतो.
नागपूर : पॉश हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने जेरबंद केले. आकाश बुधारू साहू (वय २८) असे त्याचे नाव आहे. तो जयताळ्यातील एकात्मता नगरात राहतो.
साहूने मनीषनगरातील ओयो श्रीधर सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये ६ महिन्यांपूर्वी ३५ हजार रुपये महिन्याने हॉटेल भाड्याने घेतले होते. या हॉटेलमध्ये साहू कुंटणखाना चालवीत होता. तो नागपूरसह ठिकठिकाणच्या वारांगनांना विशिष्ट मुदतीसाठी (फिक्स टर्मवर) बोलवून त्यांना ग्राहकांच्या हवाली करतो, अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा लावला. साहूसोबत पोलिसांनी पाठविलेल्या डमी ग्राहकाने संपर्क केला. दोन वारांगना ६५०० रुपयात उपलब्ध करून देण्याची तयारी साहूने दाखवली. त्याच्याशी साैदा पक्का करून दोन ग्राहक या दोन वारांगनांना घेऊन गुरुवारी रात्री हॉटेलच्या रूम नंबर २०१ आणि २०२ मध्ये शिरले. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा मारला.
वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोघींना तसेच साहूला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील एक कोलकाता येथील आहे. तिच्या आईवडिलांकडून ती दूर झाल्यानंतर आजीच्या आधाराने कोलकात्यात राहते. आरोपीने तीन दिवसांपूर्वी तिला नागपुरात आणले. तो एका ग्राहकाचे १ हजार तर दुसऱ्या वारांगनेला १५०० रुपये द्यायचा. त्यांनी पैशाचे आमिष दाखवून साहू वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बेलतरोडी ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या दोघींना मोकळे करण्यात आले. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद कदम, सहायक निरीक्षक मंगला हरडे, हवलदार अनिल अंबाडे, सुनील इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
पीसीआर ११ पर्यंत
आरोपी साहूकडे ग्राहकांची भली मोठी यादी आढळली असून, त्याच्या मोबाईलमध्ये अनेक वारांगनांचे सचित्र मोबाईल नंबर आहेत. त्याचा ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिसांनी पीसीआर मिळवला असून, पुढील तपास सुरू आहे.
---