राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:43 AM2019-03-11T11:43:39+5:302019-03-11T11:45:19+5:30
संविधान धर्मवाद्यांच्या हातात गेले तर देश संकटात येईल. म्हणून राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा, असे मर्मभेदी आवाहन स्वातंत्र्य संग्राम सैनिक व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत लीलाताई चितळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्याच्या लढ्यात सर्व भारतीय लोक जातीभेद विसरून सामील झाले होते. पण स्वातंत्र्यानंतर मिळालेले एकही आश्वासन, स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. जातीव्यवस्था नष्ट करण्यात आम्ही अपयशी ठरलो. आजतर धर्माच्या नावाखाली देशाचा सर्वोच्च धर्मग्रंथ असलेली राज्यघटनाच छिन्नविछिन्न करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. संविधान धर्मवाद्यांच्या हातात गेले तर देश संकटात येईल. म्हणून राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा, असे मर्मभेदी आवाहन स्वातंत्र्य संग्राम सैनिक व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत लीलाताई चितळे यांनी केले.
अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि संबुद्ध महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाच्या समारोपीय समारंभात विचारपीठावरून लीलाताई बोलत होत्या. याप्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक उर्मिला पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. विमल थोरात, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई साखरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. लीलाताई यांनी अत्यंत भावनिक स्वरात स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक घडामोडींचा उल्लेख केला. माझे वय ९० वर्षाचे होत आहे. मी वर गेल्यावर आंबेडकर आणि गांधी मला भेटले आणि त्यांनी ‘तुम्ही काय केले’, असे विचारले तर माझी मान शरमेने खाली जाईल, अशी खंत व्यक्त केली. म्हणून संविधान व या देशाची जबाबदारी तुमच्यावर सोपवित असल्याचे भावनिक मनोगत त्यांनी व्यक्त केले. समारोपीय समारंभात साहित्यिकांसह आंबेडकरी चळवळीत आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये लीलाताई चितळे यांच्यासह कुमुद पावडे, संमेलनाच्या संयोजिका छाया खोब्रागडे, डॉ. शांता गवई, गीता महाजन, संबुद्ध महिला संघाच्या संस्थापक सदस्या विमल गाडेकर, यामिनी चौधरी, सुलभा कडू, प्रमोदिनी रामटेके, रिता पोटपोसे, शारदा झामरे, माया उके, दिल्लीच्या पुष्पा विवेक, अनिल वासनिक, सतेश्वर मोरे तसेच आंबेडकरी साहित्य महामंळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कविता खोब्रागडे यांनी तर चारुशीला सोमकुवर यांनी आभार मानले.