अत्याचारग्रस्त महिलेस संरक्षण द्या
By admin | Published: December 25, 2014 12:26 AM2014-12-25T00:26:24+5:302014-12-25T00:26:24+5:30
सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलतरोडी रोड येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या निराधार महिलेवर तीन आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी या महिलेची झोपडी जाळून
महिलांचा मोर्चा : आरोपींना अॅट्रॉसिटी अॅक्ट लावण्याची मागणी
नागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलतरोडी रोड येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या निराधार महिलेवर तीन आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी या महिलेची झोपडी जाळून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित महिलेला पोलीस संरक्षण द्यावे तसेच आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ऋणाई शिक्षण संस्थेच्या अर्चना भोयर यांनी विधान भवनावर मोर्चा काढला.
बेलतरोडी रोड येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या महिलेवर तीन आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केला. याबाबत गुन्हा दाखल करताना सोनेगावचे पोलीस निरीक्षक शहा यांनी टाळाटाळ केली. महिला मागासवर्गीय असूनही त्यांनी अॅट्रॉसिटी अॅक्ट दाखल केला नाही. पीडित महिलेस तिच्या इच्छेविरुद्ध करुणा वसतिगृहात ठेवले. तेथे तिची सुटका करण्यासाठी गेले असता पोलिसांच्या आदेशानुसार वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी आपणास धक्काबुक्की केल्याचे अर्चना भोयर यांनी सांगितले. तीन आठवडे होऊनही पीडित महिलेस एफआयआरची प्रत देण्यात आली नाही. मोर्चात सहभागी महिलांनी जोरदार नारेबाजी करून पीडित महिलेला न्याय देण्याची मागणी केली. त्यानंतर अर्चना भोयर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी निवेदनातील मागण्यांवर लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
नेतृत्व
अर्चना भोयर
मागण्या
पीडित महिलेस पोलीस संरक्षण द्या
पीडित महिलेचे पुनर्वसन करून तिला आर्थिक मदत द्या
गुन्हा जलदगती न्यायालयात चालवा
पोलीस निरीक्षक शहा यांना निलंबित करून त्यांना सह आरोपी करा
करुणा वसतिगृहाची मान्यता रद्द करून अधीक्षिकेवर गुन्हे दाखल करा