तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:56+5:302021-06-25T04:06:56+5:30

समाजकल्याण विभागाचा आढावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कल्याण मंडळाची स्थापना ...

Protect the rights of third parties () | तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा ()

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा ()

Next

समाजकल्याण विभागाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली असून या अंतर्गत स्वयंरोजगारासाठी बीजभांडवलासह विविध योजनांची तात्काळ अंमलबजावणी करा, असे निर्देश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी गुरुवारी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षामध्ये समाजकल्याण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त अंकुश केदार, धनंजय सुटे, नक्षल प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, राज्यस्तरीय किन्नर विकास महामंडळाचे सदस्य राणी ढवळे तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कल्याण मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या शिक्षणावर भर द्यावा, त्यांना कोणत्याही शाळा-महाविद्यालयातून प्रवेश नाकारला जाऊ नये, याबाबत जनजागृती करण्यात यावी. त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालून स्वयंरोजगार मिळावा यासाठी त्यांनी सुरू केलेला व्यवसाय, लघु उद्योगांसाठी बीज भांडवल योजना सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. समाजकल्याण विभागामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र बनवून द्यावे. तसेच सर्व तृतीयपंथींयांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे. यासाठी जिल्हाधिकारी तसेच समाजकल्याण विभाग यांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तृतीयपंथी यांचे प्रतिनिधी म्हणून राणी ढवळे बैठकीत उपस्थित होत्या.

बॉक्स

वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे १५ ऑगस्टपूर्वी बदला

विभागातील गावे, वस्त्या तसेच रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत येत्या १५ ऑगस्टपूर्वी कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. यासाठी जिल्ह्यातील जातीवाचक गावे, वस्त्यांची माहिती गोळा करुन शहरी भागासाठी नगरविकास विभागाने नावे बदलविण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच ग्रामीण भागासाठी ग्रामविकास विभागाने कार्यवाही करावी. याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी स्थानिक स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करावे. यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी, डॉक्टर्स, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घ्यावी, असे निर्देशही दिले.

बॉक्स

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

यावेळी अनुसूचित जाती, जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच अशा प्रकरणांचा तपास विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावा, अशी सूचना विभागीय आयुक्तांनी केली. प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नागपूर विभागात करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.

Web Title: Protect the rights of third parties ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.