कस्तुरचंद पार्कवरील ऐतिहासिक छत्रीचे संरक्षण करा; हेरिटेज संवर्धन समितीची जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना
By मंगेश व्यवहारे | Published: October 13, 2023 02:05 PM2023-10-13T14:05:33+5:302023-10-13T14:08:13+5:30
कस्तुरचंद पार्क येथील छत्रीच्या छताचा काही भाग कोसळला असून व काही भाग कोसळण्याच्या स्थितीत
नागपूर : शहरातील ऐतिहासिक वारसास्थळ कस्तुरचंद पार्क मैदानावर अस्तित्वात असलेल्या छत्रीसदृश्य ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी रुपये ६० लक्ष ऐवढा निधी तात्काळ उपलब्ध करून द्या, अशी मागणी नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने जिल्हाधिकारी यांना केली आहे. सध्या कस्तुरचंद पार्कच्या छत्रीचा काही भाग कोसळत आहे आणि त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असे समिती सदस्यांनी लक्षात आणून दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागामध्ये हेरिटेज संवर्धन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रसिद्ध वास्तूविशारद अशोक मोखा, नगररचना विभागाचे उपसंचालक तथा सदस्य सचिव हेरेटिज समिती प्रमोद गांवडे, स्ट्रक्चरल अभियंता पी. एस. पाटणकर, रा.तू.म नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. शुभा जोहरी, नागपूर सुधार प्रन्यासचे प्रशांत भांडारकर उपस्थित होते.
बैठकीत कस्तुरचंद पार्क मैदानाच्या छत्री संदर्भात तसेच झिरो माईल येथील स्तंभाचे दुरुस्ती/नूतनीकरण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. कस्तुरचंद पार्क हे स्थळ शासनमान्य हेरीटेज सूचीनुसार अनुक्रमे ९५ वर असून, ग्रेड १ चे स्थळ आहे. आमदार प्रवीण दटके यांनी छत्रीची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला २०२३-२०२४ या वित्तीय वर्षात रुपये ६० लाख ऐवढा निधी उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. परंतु निधी अप्राप्त असल्याने कामास सुरुवात करण्यात आले नाही. कस्तुरचंद पार्क येथील छत्रीच्या छताचा काही भाग कोसळला असून व काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले आहे. तसेच यासंदर्भात समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात आले असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले आहे.
या ग्रेड-१ हेरिटेज ऐतिहासिक वास्तुच्या छत्रीची दुरुस्ती होणे गरजेचे आहे तसेच याला बॅरीकेडिंग करुन नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आवागमन करण्यास बंदी घालणे आवश्यक आहे, असेही समिती सदस्यांनी सुचित केले आहेत.