वाघ सुरक्षित तर निसर्ग सुरक्षित!

By admin | Published: July 30, 2016 02:37 AM2016-07-30T02:37:51+5:302016-07-30T02:37:51+5:30

वाघ हा निसर्गातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. तो पर्यावरणाचे संतुलन राखतो. अन्नसाखळी सुरक्षित ठेवतो.

Protect the tiger if it is safe! | वाघ सुरक्षित तर निसर्ग सुरक्षित!

वाघ सुरक्षित तर निसर्ग सुरक्षित!

Next

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा : मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
नागपूर : वाघ हा निसर्गातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. तो पर्यावरणाचे संतुलन राखतो. अन्नसाखळी सुरक्षित ठेवतो. त्यामुळे व्याघ्र दिनी सर्वांनी वाघाच्या संवर्धनाचा संकल्प घेतला पाहिजे, असे आवाहन करीत वाघ सुरक्षित तर निसर्ग सुरक्षित, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वन विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त शुक्रवारी व्याघ्र राजधानीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फडणवीस बोलत होते. मानकापूर येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, पर्यावरण राज्यमंत्री जयकुमार रावल, पोपटराव पवार, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधीर पारवे, आ. अनिल सोले, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. समीर मेघे, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) सर्जन भगत, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान व विभागीय आयुक्त अनुप कुमार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, राज्यात सातत्याने पडणारा दुष्काळ ही महाराष्ट्रासमोरची सर्वांत मोठी समस्या आहे. या दुष्काळाचा परिणाम शेतकऱ्यांवर होतो, अर्थव्यवस्थेवर होतो, तो भीषण असतो. त्यामुळे आपण अनेकवेळा हा दुष्काळ नैसर्गिक आपत्ती समजून देवाला दोष देतो. मात्र हा दुष्काळ आम्ही तयार केलेला आहे. आमच्या कृत्याने तो तयार झाला आहे. त्यामुळे ते अस्मानी संकट नाही, तर सुल्तानी व मानव निर्मित आहे. आम्ही जल, जंगल आणि जमीन या तिन्हीचे संवर्धन करणे सोडल्यामुळे हे संकट तयार झाले आहे. मानवाने निसर्गाचे प्रचंड शोषण सुरू केले आहे. निसर्गाकडून केवळ घेत गेलो आहे.
शिवाय निसर्गासाठी आपल्यालाही काही देणं असते हे विसरून गेलो आहे. या संकटातून आम्हाला बाहेर पडायचे असेल, तर जल,जंगल आणि जमिनीचे संवर्धन झालेच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी राज्यभरातील हजारो वन्यजीवप्रेमी उपराजधानीत पोहोचले होते. कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर यांनी केले. सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक किशोर मिश्रिकोटकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

वाघावरील टपाल तिकिटाचे विमोचन
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाघाच्या छायाचित्राच्या टपाल तिकिटाचे शुक्रवारी विमोचन करण्यात आले. विशेष म्हणजे, या तिकिटावर ताडोबा येथील माया ही वाघीण आपल्या बछड्याला कुशीत घेऊन असल्याचे छायाचित्र आहे. हे छायाचित्र अमोल बैस यांनी काढले असून, यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला.

मोदींसारखेच कौशल्य मुनगंटीवारांकडे
उपराजधानी ही फार भाग्यशाली आहे. या शहराच्या सभोवताल शेकडो वाघांचा अधिवास असून ते उपराजधानीचे वैभव आहे. असे गौरवोद्गार केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाच्या काढले. राज्यातील वाघांची जबाबदारी ही वनमंत्री मुनगंटीवार यांनी स्वीकारली आहे. शिवाय त्यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील वनवासी व आदिवासींचे जीवन समृद्घ व्हावे, यासाठी वनांवर आधारित उपक्रम सुरू केले. एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन आणि तो यशस्वी कसा करायचा याचे कौशल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे, ते आमच्याकडे नाही. मात्र तेच कौशल्य सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुद्धा आहेत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, विदर्भातील वाघ पाहण्यासाठी आता देश-विदेशातील पर्यटक नागपूरकडे आकर्षित होऊ लागले आहेत. मात्र त्या पर्यटकांसाठी अजूनही उपराजधानीत आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत.

‘जय’ सापडेल!
मागील तीन महिन्यांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून गायब झालेल्या ‘जय’ या वाघावर बोलताना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘जय’ हा नक्की सापडेल, असा विश्वास व्यक्त करून, त्याच्याबद्दल काहीही चिंता करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. पूर्वी कोणता वाघ कुठे जातो. कधी गायब होतो. त्याची कुणीही दखल घेत नव्हते. परंतु आज ‘जय’ दिसत नाही, म्हणून बातमीचा विषय बनला आहे. आणि हेच अपेक्षित सुद्धा असल्याचे ते म्हणाले. वाघ हे पराक्रमाचे प्रतीक आहे. शिवाय नागपूरपासून ३०० किलो मीटरच्या परिघात तब्बल ३५२ वाघांचा अधिवास आहे. त्यामुळे विदर्भ आणि नागपूर हा वाघांचा व परिक्रमाचा प्रदेश असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमातून राज्यात ‘ग्रीन आर्मी’ ची सुरुवात केली जात असल्याचीही यावेळी त्यांनी घोषणा केली.

 

Web Title: Protect the tiger if it is safe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.