संविधानाच्या संरक्षणालाच सर्वात जास्त प्राधान्य : मुख्यमंत्र्यांनी मांडली भाजपची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 08:06 PM2019-01-20T20:06:38+5:302019-01-20T20:07:37+5:30

भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेसकडून पसरविण्यात येत आहे. मात्र संविधानाचा मूळ आराखडा हा कधीही व कुणीच बदलवू शकत नाही. तशी तरतूदच संविधान निर्मात्यांनी केली होती. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची रक्षा करण्यालाच भाजपकडून सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

Protection of the Constitution is the highest priority: the Chief Minister has placed the role of BJP | संविधानाच्या संरक्षणालाच सर्वात जास्त प्राधान्य : मुख्यमंत्र्यांनी मांडली भाजपची भूमिका

संविधानाच्या संरक्षणालाच सर्वात जास्त प्राधान्य : मुख्यमंत्र्यांनी मांडली भाजपची भूमिका

Next
ठळक मुद्देकाँग्रेसने बाबासाहेबांच्या नावाचा केवळ वापर केल्याचे टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेसकडून पसरविण्यात येत आहे. मात्र संविधानाचा मूळ आराखडा हा कधीही व कुणीच बदलवू शकत नाही. तशी तरतूदच संविधान निर्मात्यांनी केली होती. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची रक्षा करण्यालाच भाजपकडून सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री विजय सांपला, कृषी राज्यमंत्री कृष्णा राज, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, व्ही.सतीश, माजी मंत्री सत्यनारायण जटिया, मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सोनकर, दुष्यंत गौतम, नारायण केसरी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला समतेचा संदेश दिला. बाबासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. काँग्रेस नेत्यांची कथनी व करणी यात बरेच अंतर होते. आम्ही बोलतो कमी, काम जास्त करतो. भाजपच्या १० वर्षांच्या शासनकाळात अनुसूचित जातींसाठी काँग्रेसपेक्षा कित्येक पटींनी जास्त काम झाले आहे. काँग्रेसने केवळ अनुसूचित जातींमधील काही लोकांनाच मोठे केले. समाज मात्र विकासापासून दूरच राहिला. संविधानाचे आम्ही रक्षणच करणार आहोत. गरीब, वंचित तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या अधिकारांसाठी संविधानात संशोधन करण्यात आले. मात्र काँग्रेस व विरोधी पक्ष अपप्रचार करत आहे. विरोधकांची दुकानदारी बंद झाली आहे. म्हणून आता ते खोटे बोलून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी लावला.
काँग्रेसला बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकारच नाही
यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकांत पराभूत केले होते. काँग्रेसने सातत्याने केवळ बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला. आम्ही मात्र बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत उभा करत आहोत. काँग्रेसच्या नेत्यांना बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. भाजपच्या शासनकाळात अनुसूचित जातींसाठी काँग्रेसपेक्षा किती जास्त काम झाले याचे उत्तर मी समोरासमोर देण्यासाठी तयार आहे, असे आव्हानदेखील मुख्यमंत्र्यांनी दिले.
अन् तीन दिवसांत मिळाली इंदू मिलची जागा
इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, ही कोट्यवधी जनतेची इच्छा आहे. मात्र संपुआ व आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्मारकासाठी एक इंचही जमीन मिळाली नाही. आमचे सरकार आल्यावर मी फाईल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेलो. त्यांनी यात समस्या काय आहे असे विचारले असता केंद्राकडूनच जमीन मिळत नसल्याचे त्यांना सांगितले. यावर त्यांनी संबंधित मंत्र्यांना बोलावून तीन दिवसांत जमीन स्मारकासाठी मिळाली पाहिजे, असे निर्देश दिले व खरोखरच पुढील तीन दिवसांत जागा मिळाली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इंदू मिल येथे २०२० पर्यंत बाबासाहेबांचे स्मारक पूर्णत्वास येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
जुलैमध्ये सुरू होणार लंडनमधील ‘म्युझियम’
बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील निवासस्थानी त्यांच्या आठवणींचा संग्रह करण्यात येत आहे. तेथील ‘म्युझियम’मध्ये त्यांची हस्तलिखिते, पत्र, दुर्मिळ चित्र इत्यादी असतील. जुलैमध्ये हे ‘म्युझियम’ सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

Web Title: Protection of the Constitution is the highest priority: the Chief Minister has placed the role of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.