बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ वस्तूंना संरक्षण

By admin | Published: May 19, 2017 02:42 AM2017-05-19T02:42:22+5:302017-05-19T02:42:22+5:30

शांतिवन चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तूंच्या संग्रहालयातील अनेक वस्तूंना अवकळा प्राप्त झाली आहे.

Protection of the rare items of Babasaheb Ambedkar | बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ वस्तूंना संरक्षण

बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ वस्तूंना संरक्षण

Next

 ‘एनआरएलसी’चा उपक्रम : १७२ ऐतिहासिक वस्तूंना नवसंजीवनी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शांतिवन चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तूंच्या संग्रहालयातील अनेक वस्तूंना अवकळा प्राप्त झाली आहे. या वस्तूंना नवसंजीवनी देण्यासाठी नॅशनल रिसर्च लेबॉरेटरी फॉर कन्झर्व्हेशन आॅफ कल्चरल प्रॉपर्टीने (एनआरएलसी) काम सुरू केले आहे. यात चिंचोली येथील संग्रहालयातून नासुप्रने १७२ वस्तू ‘एनआरएलसी’ला दिल्या असून, डिसेंबर २०१८ पर्यंत या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्या चिंचोली येथील संग्रहालयाला परत करण्यात येणार आहेत.
चिंचोली येथील संग्रहालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले कपडे, टेक्सटाईल, पेन, बॅग, बेल्ट, छत्री, टायपिंग मशीन, घड्याळ, नेमप्लेट, कंदील, काठी, स्टॅपलर अशा १७१ वस्तू एनआयटीने ‘एनआरएलसी’ला सोपविल्या आहेत. यातील ४१ दुर्मिळ वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जागतिक संग्रहालय दिनानिमित्त या ४१ वस्तूंची पूर्वीची अवस्था आणि प्रक्रियेनंतरची अवस्था दर्शविणारे फोटो मध्यवर्ती संग्रहालयात लावण्यात आले होते. डिसेंबर २०१८ पर्यंत या सर्व १७१ वस्तूंवर प्रक्रिया करून त्या चिंचोली संग्रहालयाला परत देण्यात येणार आहेत.

संरक्षणासोबत संशोधनावर भर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ वस्तूंचे जतन करताना ‘एनआरएलसी’च्या वतीने संशोधनही करण्यात येत आहे. बाबासाहेबांनी शिक्षणासाठी लंडन, बोस्टन, जपान आदी देशात काळ घालविला. संशोधनातून बाबासाहेबांचे राहणीमान उच्च दर्जाचे असल्याची बाब पुढे आली. त्यांच्या कपड्यांवरील बटनावर लंडन, बोस्टन, जर्मनी, जपान असे लिहिलेले असल्याचे ‘एनआरएलसी’मधील अभ्यासकांनी सांगितले.
ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज
‘पुरातन वस्तू संग्रहालयात गेल्यानंतर अनेक नागरिक तेथील वस्तूंना स्पर्श करतात. त्यामुळे त्या वस्तूंचे आयुष्य कमी होऊन ऐतिहासिक वारसा नष्ट होतो. अनेक जण भिंतीवर आपली नावे लिहितात. त्यातून साध्य काहीच होत नसून प्रत्येकाने आपला ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.’
-लीना झिलपे-हाते,
मुख्य कार्यकारी अधिकारी, हेरिटेज कन्झर्व्हेशन सर्व्हिसेस

Web Title: Protection of the rare items of Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.