मच्छीपूल नाल्याची संरक्षक भिंत काेसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:55+5:302021-09-08T04:12:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील मच्छीपूल परिसरातून वाहणाऱ्या मच्छीपूल नाल्याला दाेन वर्षांपूर्वी संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले हाेते. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील मच्छीपूल परिसरातून वाहणाऱ्या मच्छीपूल नाल्याला दाेन वर्षांपूर्वी संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले हाेते. शहरात नुकत्याच काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याची संरक्षक अवघ्या दाेन वर्षात काेसळल्याने या भिंतीच्या बांधकाम व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही भिंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दुर्लक्षितपणामुळे काेसळल्याचा आराेप करीत चाैकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कामठी शहरात मंगळवारी (दि. ७) सकाळी काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक-४ मधील मच्छीपूल नाल्यावरील १५० मीटर लांब संरक्षक भिंती काेसळली. ही भिंत काेसळते वेळी तिथे कुणीही नसल्याने प्राणहानी टळली. या भिंतीचे बांधकाम नागपूर येथील प्रीती बिल्डर्स कन्स्ट्रक्शन कंपनीने केले आहे. ते काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देखरेखीखाली करण्यात आले, अशी माहिती नगरसेवक राजू पाेलकमवार यांनी दिली.
या कामात कमी जाडीच्या व निकृष्ट प्रतीच्या तसेच कमी प्रमाणात लाेखंडी सळाकी व सिमेंट वापरण्यात आले. संपूर्ण बांधकाम शासकीय अंदाजपत्रक व नियानुसार करण्यात आले नाही. ही बाब महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना माहिती असूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. याबाबत ‘मजीप्रा’च्या अधिकाऱ्यांना वेळावेळी माहिती देण्यात आली हाेती. परंतु, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे या भ्रष्टाचारात ‘मजीप्रा’चे अधिकारीही सहभागी असल्याचा आराेप राजू पोलकमवार यांनी केला आहे. चाैकशी व दाेषींवर कारवाई न केल्यास आंदाेलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
...
गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
कामठी शहरातील सर्व नाल्यांवर एकूण पाच किमी लांब संरक्षक भिंती बांधण्यासाठी राज्य शासनाने १० काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला हाेता. यात शहरातील मच्छीपूल नाल्याच्या संरक्षक भिंतीचाही समावेश आहे. या कामाचे कंत्राट प्रीती बिल्डर्स कन्स्ट्रक्शन नामक कंपनीला दिले हाेते. कंपनीने हे काम दाेन वर्षापूर्वीच पूर्ण केले. अल्पावधीच भिंत काेसळल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या बांधकामाची गुण नियंत्रण विभागाकडून चाैकशी ‘मजीप्रा’चे अधिकारी व कंत्राटदार कंपनीवर करण्याची मागणी नगरसेवक राजू पाेलकमवार यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
...
या भिंत बांधकामाची याेग्य चाैकशी केली जाईल. यात दाेषी आढळणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई केली जाईल.
- स्वप्नील शेंडे, कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कामठी.
...
या संरक्षक भिंतीचे बांधकाम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देखरेखीखाली करण्यात आले. भिंत काेसळल्याने या बांधकामाची चाैकशी केली जाईल. यात दाेषी आढळणाऱ्यांवर नगर पालिका प्रशासनातर्फे कारवाई केली जाईल.
- संदीप बाेरकर, मुख्याधिकारी,
नगर परिषद, कामठी.