ग्रा.पं.अविरोध करा अन् २५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:09 AM2020-12-22T04:09:27+5:302020-12-22T04:09:27+5:30
- कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पारवे यांची अनोखी शक्कल उमरेड : नागपूर जिल्ह्यात तालुकास्तरावर कोरोनाची साखळी अद्यापही कायम आहे. ...
- कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पारवे यांची अनोखी शक्कल
उमरेड : नागपूर जिल्ह्यात तालुकास्तरावर कोरोनाची साखळी अद्यापही कायम आहे. ग्रा.पं.निवडणुकीच्या निमित्ताने तालुकास्तरावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि खेड्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रा.पं.निवडणुका अविरोध करा अन् २५ लाख रुपयांचा विकास निधी मिळवा, असे आवाहन उमरडेचे आ. राजू पारवे यांनी केले आहे.
उमरेड विभागात आतापर्यंत २२८५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ७७ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उमरेडसारख्या शहरी भागात कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. यातच उमरेड विभागात ४२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला निवडणूक होऊ घातली आहे. अशावेळी प्रचार आणि मतदान काळात ग्रामस्थ आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गर्दी करतील. अशात कोरोना संक्रमणाचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षीय राजकारण, हेवेदावे बाजूला सारत निवडणुका होऊ घातलेल्या गावातील प्रमुख लोकांनी ग्रा.पं.निवडणुका अविरोध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पारवे यांनी केले आहे. या कार्यामुळे जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण होईल. यासोबतच निवडणुका अविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रशासकीय स्तरावर गौरव होईल, असे पारवे यांनी सांगितले.