माॅर्निंग वाॅक करून वृक्षताेड करणाऱ्या प्रकल्पाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:17+5:302021-01-02T04:09:17+5:30
नागपूर : नवीन वर्षाची फर्स्ट डेची पहाट उजाडली. राेजच्या सारखेच लाेक माॅर्निंग वाॅकला निघाले. चांगले असते ते आराेग्यासाठी. पण ...
नागपूर : नवीन वर्षाची फर्स्ट डेची पहाट उजाडली. राेजच्या सारखेच लाेक माॅर्निंग वाॅकला निघाले. चांगले असते ते आराेग्यासाठी. पण काही लाेक वेगळाच उद्देश घेऊन आज माॅर्निंग वाॅकला निघाले. हा उद्देश हाेता पर्यावरण संवर्धनाचा, धरणीच्या आराेग्याचा. दृढ संकल्प हाेता आजीवन वाचविण्याचा. हजाराे झाडांची कत्तल करणाऱ्या इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पाचा निषेध करीत अबालवृद्ध, तरुणतरुणी हातात हिरवे राेपटे घेऊन नववर्षाच्या वाॅकमध्ये सहभागी झाले.
प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पासाठी अजनी रेल्वे काॅलनी परिसरात हाेणारी वृक्षताेड राेखण्यासाठी लाेकमतने सुरू केलेल्या माेहिमेला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. दरराेज वेगवेगळ्या संघटना या माेहिमेशी जुळून आंदाेलनाचा भाग हाेत आहेत. शुक्रवारी नागपूर सिटीझन फाेरमच्या कार्यकर्त्यांनी माेहिमेचा भाग हाेत परिसरात माॅर्निंग वाॅकचे आयाेजन केले. साेशल मीडियावर जाेरात प्रचार केला. याला प्रतिसाद देत सर्व स्तरातील लाेक या निषेध वाॅकमध्ये सहभागी झाले. मुले, तरुण, प्राैढ आणि ज्येष्ठही महिला-पुरुष सहभागी झाले. सर्वांचा एकच संकल्प हाेता, काेणत्याही स्थितीत येथील वनसंपदा ताेडू द्यायची नाही. सर्वांच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.
तरुणांचे ग्रुपही सहभागी
वेगवेगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांचा ड्रीम इनाेव्हेटर्स हा ग्रुप माॅर्निंग वाॅक फाॅर सेव्ह अजनी माेहिमेत सहभागी झाला. याशिवाय सायकल चालविणाऱ्या तरुणांची टीम सातत्याने वेगवेगळ्या आंदाेलनात हजेरी लावत आहेत. पहिल्यांदा स्थानिक नागरिक माेहिमेचा भाग झाले. ज्येष्ठ नागरिकही मागे राहिले नाहीत.
वृक्षाराेपणही केले
वाॅकमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला एक राेपटे देण्यात आले. काहींनी घरी नेले तर अनेकांनी याच परिसरात वृक्षाराेपण केले. जवळपास १०० च्यावर झाडांची भर यानिमित्ताने पडली.
कुणालाच इथून जायचे नाही
अनेक वर्षापासून येथे वास्तव्य करताे. अशी निसर्गरम्य जागा शहराच्या मध्यभागी मिळणार नाही. हे सर्व तुटणार, येथून निघावे लागणार, या विचाराने उदास वाटते. येथील महिलांच्या त्याच चर्चा असतात. कुणालाच इथून जायचे नाही. मात्र दबाव वाढत आहे.
- माया थाेरात, स्थानिक
पर्याय का शाेधत नाही
७००० च्यावर झाडांची कत्तल हाेईल. पशुपक्ष्यांचे घरटी तुटतील. हा विचारच अस्वस्थ करणारा आहे. अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण त्याचा विचारच केला जात नाही.
- अमित भांदूरकर
ऑक्सिजन बेल्ट वाचावा
दक्षिण नागपूरमध्ये अजनी वन हा एकमेव ऑक्सिजन बेल्ट शिल्लक आहे. नुकतीच ५० झाडे कापण्यात आल्याची माहिती मिळाली. आपण दुर्लक्ष केले तर हे संपूर्ण जंगल संपविले जाईल. अजनी वाचविण्यासाठी प्रत्येकाला पुढे यावे लागेल.
- प्रतीक बैरागी
मिलकर पेड बचाये हम
सांसे हाे रही है कम, आओ मिलकर पेड बचाये हम. आपला श्वास झाडांमुळे आहे. ते राहणार नाही तर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरावे लागेल. जंगल गेले तर तापमान किती वाढेल. हे सिमेंटचे जंगल राेखावे लागेल.
- गजेंद्रसिंग लाेहिया