नागपुरात सलून कारागिरांनी केले निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:31 PM2020-06-10T23:31:02+5:302020-06-10T23:33:16+5:30
लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून सलून व्यवसाय बंद असल्याने दुकानदार व कारागिरांचे हाल सुरू आहेत. त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवान बिडवे आणि आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्ता अनारसे यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनाला बुधवारी नागपुरात चांगला प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून सलून व्यवसाय बंद असल्याने दुकानदार व कारागिरांचे हाल सुरू आहेत. त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवान बिडवे आणि आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्ता अनारसे यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनाला बुधवारी नागपुरात चांगला प्रतिसाद मिळाला.
नागपूर शहरामध्ये प्रदेश कार्याध्यक्ष अंबादास पाटील, उपाध्यक्ष बंडू राऊत, विदर्भ अध्यक्ष श्याम आस्करकर, जिल्हाध्यक्ष गणपत चौधरी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. कारागीर व दुकानदारांनी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळात आपापल्या दुकानांसमोर उभे राहून काळ्या फिती लावून आणि मास्क लावून निषेध व्यक्त केला. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी संबंधित तहसीलदारांना निवेदने देण्यात आली.
मागील तीन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत. त्यामुळे शासनाने सलून कारागीर व दुकानदारांना १० हजार रुपये मदत करावी, दुकान सुरू केल्यावर सुरक्षा किट द्यावी, तीन महिन्याचे थकीत दुकान भाडे आणि विजेचे बिल शासनाने भरावे अशा मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. दुपारी १.३० वाजता नगाजी महाराज मठामध्ये झालेल्या छोटेखानी सभेत समारोप करण्यात आला. श्याम आस्करकर आणि राजेंद्र इंगळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाभर शांततेत आंदोलन पार पडले. राजेंद्र फुलबांधे, राजू चिंचाळकर, भूषण सवाईकर, सुनील मानेकर, सतीश कान्हेरकर, विनेश कावळे, विजय वलोकर, दिनेश सूर्यवंशी, हितेश चौधरी, सतीश सुरशे, नितीन पांडे, योगेश नागपूरकर, महादेव जिचकार आदींसह अनेकांनी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.