धार्मिक स्थळ तोडण्याला विरोध ,इंदिरा मातानगरात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:00 IST2018-08-27T23:56:29+5:302018-08-28T00:00:03+5:30

गेल्या काही दिवसापासून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची बंद असलेली मोहीम सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु नासुप्रच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागते. उत्तर नागपुरातील इंदिरा मातानगर येथील अनधिकृ त धार्मिक स्थळ तोडण्याला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. संतप्त जमावामुळे पथकाला कारवाई थांबवावी लागली.

Protest to breaking religious shrines, tension in Indira Mathangarh | धार्मिक स्थळ तोडण्याला विरोध ,इंदिरा मातानगरात तणाव

धार्मिक स्थळ तोडण्याला विरोध ,इंदिरा मातानगरात तणाव

ठळक मुद्देनासुप्रने उत्तर नागपुरातील तीन धार्मिक स्थळे हटविली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसापासून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची बंद असलेली मोहीम सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु नासुप्रच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागते. उत्तर नागपुरातील इंदिरा मातानगर येथील अनधिकृ त धार्मिक स्थळ तोडण्याला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. संतप्त जमावामुळे पथकाला कारवाई थांबवावी लागली.
पथकातील अधिकाऱ्यांनी धार्मिक स्थळाच्या कमिटीच्या सदस्यांसोबत चर्चा केली. धार्मिक स्थळ खूप वर्षापूर्वीचे असून कमिटीकडे आवश्यक कागदपत्रे असल्याने धार्मिक स्थळाला अवैध म्हणता येणार नाही, असा दावा कमिटीच्या सदस्यांनी केला. अखेर पथकाने दोन दिवसाची मुदत देऊ न कारवाई थांबिवली. दोन दिवसात आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सूचना कमिटीला करण्यात आली. मात्र पथकाने धार्मिक स्थळाच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या चार दुकानांचे अतिक्रमण हटविले.
नासुप्रच्या पथकाने उत्तर नागपुरातील पंचवटीनगर, इंदिरा मातानगर व आनंदनगर भागातील तीन अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. दुपारी १.३० च्या सुमारास पंचवटीनगर येथील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम हटविण्यात आले. त्यानंतर पथक इंदिरा मातानगर येथील बिनाकी झोपडपट्टीतील धार्मिक स्थळ तोडण्यासाठी पोहचले. परंतु धार्मिक स्थळ हटविण्याला नागरिकांनी विरोध केला. ही जमीन नासुप्रच्या स्लम विभागाच्या मालकीची असून येथे धार्मिक स्थळ उभारण्याला नासुप्रने परवानगी दिली नसल्याचा अधिकाऱ्यांना दावा होता. दीड तास नागरिकांनी कारवाईला विरोध केला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत धार्मिक स्थळाच्या जागेबाबतची कागदपत्रे मागितली. परंतु नागरिकांकडे जागेची कागदपत्रे नसल्याने धार्मिक स्थळाचे गेट तोडण्यात आले. रात्री ८वाजेपर्यंत पथकाची कारवाई सुरू होती. धार्मिक स्थळाच्या आजूबाजूला घरांचे बांधकाम केले असल्याने कारवाई पूर्ण झाली नाही. पोलीस बंदोबस्तात पुन्हा कारवाई करणार असल्याची माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी, विभागीय अधिकारी (उत्तर) अनिल राठोड, सुधीर राठोड व पथक प्रमुख मनोहर पाटील आदींच्या नेतृत्वात करण्यात आली.

चुनाभट्टी येथील धार्मिक स्थळ हटविले
महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने धंतोली झोनच्या क्षेत्रातील चुनाभट्टी येथील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम हटविले. दुसऱ्या पथकाने महाल झोन मधील गांधीबाग भागातील गडरलाईनवर उभारण्यात आलेली दोन शौचालये तोडली. सखी तोलानी व रामचंद्र अवथे यांनी हे अवैध बांधकाम केले होते.

Web Title: Protest to breaking religious shrines, tension in Indira Mathangarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.