आंदोलकांनी सोडले मैदान!

By admin | Published: December 14, 2014 12:43 AM2014-12-14T00:43:59+5:302014-12-14T00:43:59+5:30

हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यासाठी पटवर्धन मैदानाची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे मागील पाच दिवसांपासून विविध संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन सुरू आहे.

The protesters left the ground! | आंदोलकांनी सोडले मैदान!

आंदोलकांनी सोडले मैदान!

Next

पटवर्धन मैदान परिसरात शांतता : कुणी वळले मनोरंजनाकडे, काहींनी केला आराम
गणेश खवसे - नागपूर
हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यासाठी पटवर्धन मैदानाची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे मागील पाच दिवसांपासून विविध संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र शुक्रवारी अधिवेशनाचे कामकाज संपण्यापूर्वीच आंदोलक ‘त्या’ मंडपातून गायब झाल्याचे दिसून आले. दोन दिवस आता कामकाज नसल्याने आणि त्यातच आमदार-मंत्री आपल्याकडे फिरकणार नसल्याची शक्यता असल्याने अनेक आंदोलकांनी ‘मैदान’ सोडले. शनिवारीसुद्धा असेच चित्र होते.
सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले. विशेष म्हणजे, १५ वर्षांनंतर स्थापन झालेल्या भाजप - शिवसेना सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनात तरी आपल्याला न्याय मिळेल, आपल्या मागण्या सोडविल्या जाईल, अशी खात्री असल्याने अनेक संघटनांनी धरणे आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब केला.
पहिल्याच दिवशी १० पेक्षा अधिक संघटनांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये वाढ झाली. या मैदानात धरणे आंदोलनासोबतच साखळी उपोषणही काही संघटनांनी सुरू केलेले आहे. गेल्या पाच दिवसांत तेथे अनेक आमदारांनी भेटी दिल्या. काही संघटनेच्या मागण्यांचे निवेदन पोलिसांमार्फत संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. काहींना चर्चेसाठी बोलविले. मागण्या सोडविण्याचे आश्वासन मिळताच धरणे आंदोलन करणाऱ्या काही संघटनांनी आंदोलनाची सांगता केली. परंतु, अद्याप बऱ्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे समाधान होऊ न शकल्याने ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. असे असले तरी शुक्रवारचे कामकाज संपण्यापूर्वी आंदोलकांमध्ये नैराश्याची लाट पसरली. काही आंदोलक मंडपातच आराम करीत बसले होते, काही मनोरंजनात गुंतले तर बरेचसे आंदोलक परिसर सोडून बाहेर फिरण्यास गेले होते. आता पुढे दोन दिवस कामकाज नसल्याने असे चित्र धरणे आंदोलनस्थळी होते.
आंदोलक गेले कुठे?
धरणे आंदोलन सुरू असताना काही आंदोलकांनी बाहेरची वाट धरली. बहुतांश संघटनेच्या मंडपात असे चित्र शुक्रवारी दिसून आले. केबीसी ठेवीदार संघटनेच्या मंडपातही असेच काहीसे चित्र होते. तेथे काही वृद्ध व्यक्ती आराम करीत बसले होते. त्यांच्या भोवती बॅगाच बॅगा होत्या. याबाबत अधिक माहिती घेतली असता शुक्रवारी या संघटनेचा मोर्चा होता. त्यात सहभागी होण्यासाठी ते सर्व आंदोलक गेले होते. त्या सर्वांच्या बॅगा मात्र मंडपातच होत्या.

Web Title: The protesters left the ground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.