निषेध आणि निदर्शने, शहरातील जनजीवन सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:06 AM2020-12-09T04:06:47+5:302020-12-09T04:06:47+5:30
शहरातील ऑटोमोटिव्ह चौक, संविधान चौक आणि सीताबडी चौक हे आजच्या आंदोलनातील केंद्रबिंदू होते. या ठिकाणी विविध संघटनांच्या आंदोलकांनी ...
शहरातील ऑटोमोटिव्ह चौक, संविधान चौक आणि सीताबडी चौक हे आजच्या आंदोलनातील केंद्रबिंदू होते. या ठिकाणी विविध संघटनांच्या आंदोलकांनी एकत्रित येऊन भारत बंदला पाठिंबा दर्शवित घोषणाबाजी केली. आयटकने केलेल्या आंदोलनात महिलांची गर्दी लक्षणीय होती. हातात फलक घेऊन महिला घोषणाबाजी करीत होत्या. व्हेरायटी चौकात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निदर्शने केली. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी कोराडी नाका चौकात आंदोलन केले. रेशन दुकानदार संघानेही व्हेरायटी चौकात निदर्शने केली तर राष्ट्रीय किसान संघाच्या कार्यकर्त्यांनीही तीव्र घोषणाबाजी करीत निदर्शने केली.
या सोबतच रिपब्लिकन संघटना, तसेच साप्ताहिक बाजार विक्रेता संघानेही निदर्शने करीत बंदला पाठिंबा दर्शविला. संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
या संपाला व्यापक प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा गृहीत धरून पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात ठेवण्यात आला होता. प्रशासनाने आणि पोलीस विभागाने यासाठी उत्तम नियोजन केले होते. बंद शांततेत पार पडावा यासाठी पोलीस आयुक्त स्वत: प्रयत्नशील होते. बंदच्या पूर्वसंध्येला त्यांनी वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजकीय पक्ष, संघटना, आणि संपकर्त्या शेतकऱ्यांच्या समर्थकांनी हा बंद शांततेत पार पाडला.
बाजार समित्यांंचा संपूर्ण पाठिंबा या बंदला दर्शविण्यात आला होता. त्यामुळे त्याचा परिणाम पडला. वाहतूकदार संपात असल्याने मालाची आवक झाली नाही. शहरातील धान्य बाजारपेठा मात्र आज दुपारपर्यंत बंद होत्या. भाजीबाजार सुरळीत होता. बंदचे आवाहन करणाऱ्या संघटनांनी आणि प्रतिनिधींनी सामंजस्य दाखवत बंदसाठी शहरात बळजबरी केल्याच्या घटनांची नोंद नाही. शहरातील किराणा बाजारपेठा सुरू होत्या. कळमना मार्केट, इतवारी, महाल, बर्डी, सराफा बाजारही सुरळीत सुरू होता. संत्रा बाजारावरही फारसा परिणाम जाणवला नाही. कळमना मार्केटमधील आवकही सुरू होती.
या बंदला अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. नागपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याकडून बंदमध्ये शांततेत समर्थन करण्याचे आवाहन करण्यात आले. सकाळच्या सुमारास संविधान चौकामध्ये बंद समर्थकांनी एकत्रित येण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडून बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले जात होते.
कोराडी नाका चौकात एकत्रित झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. वाहतूक सुरळीत सुरू होती. शहरातील ऑटोसेवाही रोजच्या प्रमाणेच सुरू असल्याने संपाचा दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम पडल्याचे जाणवले नाही.
...
ऑटोमोटिव्ह चौकात आंदोलन
ऑटोमोटिव्ह चौकामध्ये आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने गोळा झाले होते. शीख समाजाचे लोक येथे मोठ्या संख्येने गोळा झाले होते. त्यात तरुणांसह मुलांचाही समावेश होता. या गर्दीमुळे यंत्रणेवरचा ताण काही काळ वाढला. निदर्शने, घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता.