समृद्धी महामार्गाचे जानेवारीत भूमिपूजन, न्याय मिळतो या विश्वासाने आंदोलने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 05:48 AM2017-10-23T05:48:24+5:302017-10-23T05:48:54+5:30
राज्याचे आर्थिक चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या समृद्धी महामार्गासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत जमीन खरेदीचे ५० टक्के काम पूर्ण होईल, तर डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीमध्ये या महामार्गाचे भूमिपूजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.
नागपूर : राज्याचे आर्थिक चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या समृद्धी महामार्गासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत जमीन खरेदीचे ५० टक्के काम पूर्ण होईल, तर डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीमध्ये या महामार्गाचे भूमिपूजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामगिरीवर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील अडथळे जवळपास दूर झाले आहेत. कोरियाकडून पतपुरवठा होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी संपल्या आहेत.
राज्यात विविध प्रश्नांवरून आंदोलने केली जात आहेत, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, पूर्वीच्या सरकारमध्ये कोडगेपणा होता. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना आंदोलन करून काही पदरी पडेल, याचा विश्वास वाटत नव्हता. आमचे सरकार संवेदनशील आहे. येथे न्याय मिळतो, असा आंदोलकांना विश्वास आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी आंदोलने होत आहेत. अंगणवाडीसेविकांना मागील सरकारने चार हजार मानधनावर ठेवले होते. ते पन्नास टक्क्यांनी वाढविले, तरी आंदोलन सुरूच आहे, असेही ते म्हणाले.
>विदर्भाच्या निधीत कट नाही
विदर्भाला शक्य तेवढे देण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे आता पहिली नियुक्ती किंवा पदोन्नती विदर्भातच होते, असे आमचे धोरण आहे. विदर्भातील रिक्त जागाही भरल्या जात आहेत. विदर्भाच्या निधीत कुठेही कट लावला जात नाही. विकासात विदर्भाला मागे पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
>अपप्रचाराला उत्तर देणार
सोशल मीडियावरून भाजपा व सरकारचा अपप्रचार केला जात आहे. मात्र, आता या अपप्रचाराला उत्तर दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडियासाठी विशेष टीम तयार केली आहे. दोन महिन्यांपासून सोशल मीडियात दिसून येणारी नकारात्मकता त्याचाच परिणाम आहे. बनावट अकाउंट तयार करून टिष्ट्वट्स, रिटिष्ट्वट तयार केले जात असल्याचे आढळून आले आहे. रशियासारख्या देशातून अशा पोस्ट टाकल्या जात असल्याचे समोर आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
>‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्ष स्थापन करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील वर्णीबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले, ‘राणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातही येतील.’