राजकीय वादांवरून रस्त्यांवर आंदोलन, मात्र प्रदेशाध्यक्षांवरील आरोपांनंतर मौन

By योगेश पांडे | Published: November 23, 2023 12:34 PM2023-11-23T12:34:36+5:302023-11-23T12:37:31+5:30

भाजपचे बरेच आमदार, पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरून आश्चर्य : कार्यकर्तेदेखील संभ्रमात

Protests on the streets over political disputes, but silence after allegations against BJP state head Chandrashekhar Bawankule | राजकीय वादांवरून रस्त्यांवर आंदोलन, मात्र प्रदेशाध्यक्षांवरील आरोपांनंतर मौन

राजकीय वादांवरून रस्त्यांवर आंदोलन, मात्र प्रदेशाध्यक्षांवरील आरोपांनंतर मौन

योगेश पांडे

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील कथित कॅसिनो फोटोवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आरोप करत भाजपलाच आव्हान दिले आहे. यावरून राजकारण तापले असून खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील बावनकुळे यांच्या समर्थनार्थ धावून आले; मात्र लहान-मोठ्या राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोपांनंतर सार्वजनिकपणे व सोशल माध्यमांवर व्यक्त होणाऱ्या नागपुरातील भाजपच्या बऱ्याच आमदार, पदाधिकाऱ्यांनी मात्र यावर चक्क मौन बाळगल्याचे दिसून आले. एरवी अशा आरोपांनंतर थेट रस्त्यांवर येऊन आंदोलनाची भाषा करणारे पदाधिकारी आता शांत का हीच चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असून यावरून विविध कयास लावण्यात येत आहेत.

बावनकुळे हे मकाऊ येथे कौटुंबिक सहलीसाठी गेले असता कॅसिनोत त्यांनी एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उधळल्याचा आरोप करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. बावनकुळे व भाजपाकडून या आरोपांचे खंडन करण्यात आले व मुंबईतील नेते मोहीत कंबोज यांनी आक्रमक भूमिका घेत ट्वीटदेखील केले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातूनच राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांची मानसिकता विकृत झाली असल्याची टीका केली होती.

एरवी भाजपच्या एखाद्या नेत्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप झाले तर बावनकुळे हे स्वत: विरोधकांवर तुटून पडतात; मात्र बावनकुळे यांच्यावरील आरोपांनंतर नागपुरातील भाजपचे अनेक आमदार, पदाधिकारी यांच्याकडून हवे तसे समर्थन मिळाले नसल्याचे चित्र आहे. केवळ भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सार्वजनिकपणे सोशल माध्यमांवर बावनकुळे यांना समर्थन करत संजय राऊत यांच्यावर टीका केली. तसेच राऊत यांनी असेच आरोप केले तर त्यांना वैदर्भीय भाषेत प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा दिला; मात्र भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी सार्वजनिकपणे कुठलेच भाष्यदेखील केले नाही व सोशल माध्यमांवरदेखील केवळ विश्वास पाठक यांचे ‘ट्वीट’ शेअर केले.

माजी शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके यांनीदेखील फडणवीस यांचीच प्रतिक्रिया शेअर केली; मात्र यांच्या व्यतिरिक्त एकाही आमदार किंवा इतर मोठ्या पदाधिकाऱ्याने खुलेआमपणे बावनकुळे यांच्या समर्थनार्थ भाष्य केले नाही. यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्याचा सूर व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आता आक्रमक पवित्रा का नाही ?

कंत्राटी पदभरतीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनावर आरोप लावल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आंदोलन पुकारले होते. मविआ व भाजपमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर भाजप व भाजयुमोचे कार्यकर्ते बऱ्याचदा रस्त्यांवर आंदोलन करत उतरले; मात्र एरवी आक्रमक होणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून आता आक्रमक पवित्रा का घेण्यात आलेला नाही, यामागे भाजपमधील अंतर्गत समीकरणे आहेत की इतर काही कारण आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title: Protests on the streets over political disputes, but silence after allegations against BJP state head Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.