कोरोना रुग्णांसाठी खाटांची एकत्रित माहिती नागरिकांना द्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:12 AM2021-03-25T00:12:32+5:302021-03-25T00:15:30+5:30

Sanjivkumar नवीन कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागपूरसह विभागातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटांची व्यवस्था करून उपलब्ध असलेल्या खाटांची एकत्रित माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्या, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले.

Provide aggregated information of beds for corona patients to citizens | कोरोना रुग्णांसाठी खाटांची एकत्रित माहिती नागरिकांना द्या 

कोरोना रुग्णांसाठी खाटांची एकत्रित माहिती नागरिकांना द्या 

Next
ठळक मुद्देमेडिकलमध्ये ९० अतिरिक्त खाटांची सुविधामेघे रुग्णालयात आयसीयूसह अतिरिक्त खाटाकोरोनासंबंधित आरटीपीसीआर तपासण्या वाढवा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नवीन कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागपूरसह विभागातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटांची व्यवस्था करून उपलब्ध असलेल्या खाटांची एकत्रित माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्या, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले. महापालिकेतर्फे शहरातील सर्व रुग्णालयांमधील उपलब्ध व्यवस्थेबद्दलची माहिती संकलित करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

कोरोनासंदर्भात वैद्यकीय सुविधांचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीत महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे आयुक्त शंतनू गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे आदी उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढते असून त्या प्रमाणात तपासणी मोहीम महापालिका व जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. बाधित रुग्णांची सरासरी ३१.३५ टक्के या प्रमाणात आहे. कोरोनाबाधित रुग्णांसोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची तपासणी मोहीम राबवण्यासोबतच ज्या परिसरात रुग्णवाढीचे प्रमाण जास्त आहे अशा परिसरात तत्काळ कठोर निर्बंध लागू करावेत. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना वेळेवर औषध व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बाधित रुग्ण बाहेर फिरणार नाही याची दक्षता घेऊन कठोर कारवाई करावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.

जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात सरासरी आयसीयू नसलेले एक हजार खाटा तसेच खासगी रुग्णालयात २,३६७ खाटा उपलब्ध आहेत. आयसीयूसह शासकीय रुग्णालयात ३८० तर खासगी रुग्णालयात ८१८ खाटा उपलब्ध असून यामध्ये शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय तसेच मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त ९० खाटांची वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येनुसार खासगी रुग्णालयामध्येही खाटांच्या संख्येत वाढ करावी, अशा सूचना यावेळी बैठकीत करण्यात आल्या.

ऑक्सिजनचे दोन अतिरिक्त टँकर मागविणार

नागपूर जिल्ह्यासह विभागासाठी भिलाई स्टील प्लँट येथून दररोज ऑक्सिजन टँकर उपलब्ध होत आहेत. यामध्ये वाढ करून अतिरिक्त दोन टँकर उपलब्ध करून देण्यासंबंधी संबंधित कंपनीला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अकोला व नांदेडसाठी पुण्यावरून ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्यामुळे नागपूर विभागासाठी मागणीनुसार ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन वापरावर निर्बंध आणून ८० टक्के ऑक्सिजन आरोग्य सेवेसाठी तर २० टक्के ऑक्सिजन उद्योगासाठी वापरण्यासंबंधी निर्देश जाहीर करावे, अशा सूचना डॉ. संजीव कुमार यांनी बैठकीत दिल्यात.

विभागात ६४ टक्के नागरिकांचे लसीकरण

नागपूर विभागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत ६० वर्षांवरील नागरिक तसेच ४५ वर्षांपर्यंतच्या आजारी रुग्णांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत १ लाख ७५ हजार ९१२ लसीकरणाचे डोस देण्यात आले असून ६४ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी लसीकरण केंद्रांची वाढ करण्यात आली असून नागपूर जिल्ह्यात दररोज दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. जयस्वाल यांनी बैठकीत सांगितले.

Web Title: Provide aggregated information of beds for corona patients to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.