तळागाळातील व्यक्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहचविणार : चंद्रशेखर बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 07:16 PM2019-07-17T19:16:10+5:302019-07-17T19:21:20+5:30
समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणी व रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणी व रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
बचत भवन येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा आरंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. समीर मेघे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपायुक्त (पुरवठा) रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, अन्नधान्य वितरण अधिकारी लीलाधर वार्डेकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थींना गॅस जोडणी व रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.
पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे म्हणाले, सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम आणि अधिक परिणामकारक करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग काम करीत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बदलामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्याला मदत देता येत असून, नव्याने लाभार्थी जोडता येत आहेत. समाजातील तळागळातील व्यक्ती, वंचित घटकांपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागळातील लोकांना गॅस जोडणी व रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात येणार आहे. याबरोबरच सर्वांसाठी घरे, आयुष्यमान भारत यासारख्या योजनांद्वारेही जनसामान्यांना दिलासा देण्यात येत आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे एक कुटुंब स्वावलंबी होण्यास हातभार लागतो, असे बावनकुळे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे अद्यापही रेशन कार्ड अथवा गॅस जोडणी नाही अशा पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले. सर्व पात्र कुटुंबांना १०० टक्के शिधापत्रिका वितरण, सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना १०० टक्के धान्य वितरण तसेच सर्व कुटुंबांना १०० टक्के गॅस जोडणी (एलपीजी) वितरित करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.
यांना मिळणार लाभ, असे करा निवेदन
सर्व पात्र कुटुंबांना १०० टक्के शिधापत्रिका वितरणाकरिता विहित नमुन्यातील अर्ज, कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स, कुटुंबप्रमुख महिला सदस्याचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो, कुटुंबप्रमुखाच्या बँक पासबुकची झेरॉक्स, रहिवासी पुरावा म्हणून घर टॅक्स पावती, वीज बिल, मतदान कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच वार्षिक उत्पन्न शहरी भागात राहणाऱ्यांना ५९ हजार रुपये, तर ग्रामीण भागात राहणाऱ्यांना ४४ हजार रुपयाच्या आत असलेल्यांना प्राधान्य. या योजनेचा लाभ मिळेल. जुन्या शिधापत्रिकेवर वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयाच्यावर असल्यास उत्पन्न कमी असल्याचे कुटुंबप्रमुखाचे हमीपत्र. विधवा, दुर्धर आजारग्रस्त, अपंग असल्यास त्यासंबंधीची कागदपत्रे आवश्यक आहेत. सर्व पात्र कुटुंबांना १०० टक्के गॅस जोडणी (एलपीजी) देण्याकरिता कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स, कुटुंबप्रमुख महिला सदस्याचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो, कुटुंबप्रमुखाच्या बँक पासबुकची झेरॉक्स, शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, विहित नमुन्यातील केवायसी अर्ज आवश्यक आहे. केवायसी अर्ज स्वस्त धान्य दुकानामध्ये मोफत उपलब्ध आहे.