गरिबांना सुलभ व स्वस्त आरोग्यसेवा मिळावी
By admin | Published: January 21, 2016 02:40 AM2016-01-21T02:40:21+5:302016-01-21T02:40:21+5:30
आरोग्यसेवा संदर्भात कायदे अस्तित्वात आहेत. यांचा उपयोग झाला तर विधायक गोष्टी होऊ शकतात, हे अलीकडे दिसून आले आहे.
न्या.भूषण गवई : विधी महाविद्यालयात ‘जस्टा कॉजा’चे उद्घाटन
नागपूर : आरोग्यसेवा संदर्भात कायदे अस्तित्वात आहेत. यांचा उपयोग झाला तर विधायक गोष्टी होऊ शकतात, हे अलीकडे दिसून आले आहे. आरोग्यसेवा महाग झाली आहे, ही बाब खरी आहे. मी स्वत: याचा अनुभव घेतला आहे. गरिबांना सुलभ व स्वस्त आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील ‘जस्टा कॉजा’ या विधी महोत्सवाचे बुधवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
विधी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कराड येथील ‘कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस’चे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, कुलसचिव पुरण मेश्राम, प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार प्रामुख्याने उपस्थित होते. न्या.गवई यांनी न्यायादानाच्या वेळी आरोग्याबाबत येणाऱ्या अनेक याचिकेबाबत माहिती दिली. आरोग्यक्षेत्राशी संबंधित अनेक कायद्यांमुळे बऱ्याच नकारात्मक बाबींवर वचक आला आहे. परंतु आरोग्यसेवा महाग झाल्या असून त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाला सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे व त्यादृष्टीने प्रयत्न वाढले पाहिजेत, असे न्या.गवई म्हणाले. नागरिकांना आरोग्याचा अधिकार मिळावा यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कायदे करण्यात आले आहे. परंतु या कायद्यांबाबत फारशी जागृती मात्र झालेली नाही. जर देशातील आरोग्यसेवा सक्षम करायची असेल तर संबंधित कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
देशातील ८० टक्के आरोग्यसेवा खासगी संस्थांचा हाती आहेत. त्यावर केवळ २० टक्के जनता अवलंबून आहे. परंतु उरलेल्या २० टक्के शासकीय आरोग्यसेवेवर देशातील ८० टक्के जनता अवलंबून आहे. त्यामुळे हव्या तशा आरोग्यसेवा मिळू शकत नाही. उपचार घेण्यासाठीदेखील नागरिकांना कर्ज काढावे लागते. ही स्थिती बदलण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.मिश्रा म्हणाले. कुलगुरू डॉ.काणे यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. कोमावार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ.मृण्मयी कुकडे व गौरी पुरोहित यांनी संचालन केले तर डॉ. विभा महाजनी यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)