विदर्भातील उद्योगांना वीज सबसिडी देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 08:05 PM2022-08-16T20:05:32+5:302022-08-16T20:06:05+5:30

Nagpur News नागपूर हे ‘एज्युकेशन हब’ होत आहे. शिक्षण दर्जेदार असेल तर उत्तम कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण होईल. उद्योग व्यवसाय येतील. यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Provide electricity subsidy to industries in Vidarbha; Devendra Fadnavis' announcement | विदर्भातील उद्योगांना वीज सबसिडी देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

विदर्भातील उद्योगांना वीज सबसिडी देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Next

नागपूर : येत्या काळात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करताना विदर्भाच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले जाईल. विदर्भातील उद्योगांना वीज सबसिडी दिली जाईल. या ठिकाणी गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केले जातील. नागपूर हे ‘एज्युकेशन हब’ होत आहे. शिक्षण दर्जेदार असेल तर उत्तम कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण होईल. उद्योग व्यवसाय येतील. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यसंग्रामात नागपूर शहराने अभिमानास्पद भूमिका बजावली. नागपूर शहराने ‘चले जाव’ चळवळीत मोठे योगदान दिले. अनेक जण शहीद झाले. त्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानापुढे आम्ही नतमस्तक आहोत. अतिवृष्टीमुळे सध्या शेतकरी त्रस्त आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दुप्पट मदत जाहीर केली आहे, असे सांगून ते म्हणाले, केवळ हीच नव्हे तर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी, दुरुस्तीसाठी, जनावरांच्या नुकसानीसाठीसुद्धा मदत केली जाईल.

यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील विद्यार्थी, केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत राज्यातील स्वच्छ विद्यालयाचा पुरस्कार त्रिमूर्तीनगर, नागपूरला मिळाला आहे. त्यांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डागा मेमोरियल शासकीय रुग्णालय, आशा हॉस्पिटल कामठी, महाआवास योजनेत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कार्य करणारी उत्कृष्ट पंचायत समिती रामटेक, राज्य पुरस्कृत प्रथम क्रमांक मिळवणारी पंचायत समिती नागपूर ग्रामीण, उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून खेडी गोवर्धन व राज्यस्तरीय योजनेत प्रथम क्रमांक प्राप्त करणारी सावनेर तालुक्यातील ग्रामपंचायत किरणापूर, सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून मुकेश तुकाराम तुरकर हिंगणा, मयूर शैलेंद्र कोल्हे रामटेक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आदिवासी विकास अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, माहिती आयुक्त राहुल पांडे, माजी आमदार एस. क्यू. जमा, स्वातंत्र्यसैनिक यादवराव देवगडे, आदी उपस्थित होते.

Web Title: Provide electricity subsidy to industries in Vidarbha; Devendra Fadnavis' announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.