वन कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:01 PM2019-05-06T23:01:52+5:302019-05-06T23:04:03+5:30
वन कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाप्रमाणे सुविधा देण्याची मागणी महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या विदर्भस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वन कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाप्रमाणे सुविधा देण्याची मागणी महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या विदर्भस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेची विदर्भस्तरीय कार्यकारिणीची बैठक केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हरिसिंग सभागृह, सेमिनरी हिल्स येथे आयोजित करण्यात आली. बैठकीत विविध विषयांवरील संघटनेचे धोरण ठरविण्यात आले. त्यानंतर वनरक्षक, वनपाल यांची तक्रार निवारण सभा प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. आर. मंडे यांच्या कक्षात घेण्यात आली. मंडे यांनी समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. सभेत वनरक्षक, वनपालांची अन्यायकारक वेतनश्रेणी, राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ प्रशासकीय शिफारस, संप काळातील वेतन मिळावे, कायम प्रवास भत्त्यातील त्रुटी दुर कराव्या, अति दुर्गम भागात मोटारसायकल पुरवठा करावा, साप्ताहिक रजा, रजा कालावधीतील वेतन अतिरिक्त कर्तव्य भत्ता पोलीस विभागाप्रमाणे मिळावा, कर्तव्यादरम्यान मृत्यू झाल्यास पोलीस विभागाप्रमाणे लाभ मिळावेत आदी मागण्या करण्यात आल्या. तक्रार निवारण सभेला संघटनेचे कार्याध्यक्ष माधव मानमोडे, संरक्षक दिलीप कापशिकर, रामदास धोटे, विशाल मंत्रीवार, भारत मडावी, सुधीर हाते, नितीन गडपायले, पूनम बुद्धावार, प्रभाकर अनकरी, बापूराव गायकवाड, संजय माघाडे, सपना टेंभरे, सचिन गडलिंगे, संजय पर्रेकर, अनिल खडतकर, अश्विनी डोंगरे, शरद घुगे, विजय रामटेके, नरेश चापले, लहुकांत काकडे आदी उपस्थित होते.