कोरोनामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:07 AM2021-05-18T04:07:33+5:302021-05-18T04:07:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली असून, त्यांच्या शिक्षणात खंड पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे, अशी मागणी प्राधिकरण सदस्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य दिनेश शेराम यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना पत्रदेखील लिहिले आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे कोविडमुळे निधन झाले असेल त्यांची यादी करून त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत. सोबतच १८ वर्षांवरील विद्यार्थ्यासाठी प्राधान्यक्रमाने महाविद्यालयात लसीकरण मोहीम प्रभावीप्रमाणे राबविली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बैठक आयोजित करून कोरोना संक्रमण बचाव, प्राथमिक उपचार, लसीकरण, तणाव निवारण इत्यादी विषयांवर डॉक्टर व तज्ज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शन करण्यात यावे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जागृती मोहीम राबवावी, अशी मागणी शेराम यांनी केली.
विद्यार्थ्यांचे परीक्षा व महाविद्यालयीन शुल्क माफ करा
विद्यापीठाच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटरची स्थापना करावी आणि विद्यार्थी व विद्यापीठ कर्मचारी यांना त्यात प्राधान्य देण्यात यावे. विद्यापीठामार्फत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संशोधन प्रकल्प राबविण्यात यावे. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व महाविद्यालयीन शुल्क माफ करावे, अशी मागणीदेखील दिनेश शेराम यांनी केली.