गरिबांना स्वस्त दरात आरोग्य सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2016 02:56 AM2016-01-18T02:56:53+5:302016-01-18T02:56:53+5:30

आरोग्य क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. विदेशातील लोक भारतात उपचारासाठी येत आहेत.

Provide health services at cheapest rates to the poor | गरिबांना स्वस्त दरात आरोग्य सेवा द्या

गरिबांना स्वस्त दरात आरोग्य सेवा द्या

Next

नितीन गडकरी : ‘नागपूर लाईव्ह-२०१६’चा समारोप
नागपूर : आरोग्य क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. विदेशातील लोक भारतात उपचारासाठी येत आहेत. परंतु देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे. हृदयरोगावरील उपचार फार महागडे आहेत. यामुळे स्वस्त आरोग्य सेवा देण्यासाठी संशोधनावर भर देणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
अर्नेजा हार्ट अ‍ॅण्ड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया (सीएसआय) व असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया, विदर्भ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून दोन दिवसीय ‘नागपूर लाईव्ह-२०१६’चे आयोजन करण्यात आले होते. रविवारी याच्या समारोपीय प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, आयोजन समितीचे प्रमुख डॉ. जसपाल अर्नेजा, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबईचे प्रसिद्ध हृदयशल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा, जसलोक हास्पिटल मुंबईचे डॉ. अश्विन मेहता, फोर्टिस एस्कॉटर््स हार्ट इन्स्टिट्यूूट दिल्लीचे डॉ. अशोक सेठ, डॉ. जय देशमुख, डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. नितीन तिवारी, डॉ. अशोक वासनकर, डॉ. भूपेंद्रसिंह अर्नेजा, डॉ. निखिल बालंखे व डॉ. इंदू अर्नेजा आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, जगात भारतातील डॉक्टर आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर्संनी आपले नाव कमावल्याने भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. अमेरिकेत १० मधून चार डॉक्टर भारतीय आहेत. आरोग्य क्षेत्रात नित्य नवे बदल होत आहेत, याची माहिती डॉक्टरांना असणे आवश्यक आहे. ‘नागपूर लाईव’ सारख्या परिषदेतून डॉक्टरांना ‘अपडेट’ होण्याची संधी मिळते. अशा परिषदांमधून संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे कार्यही होणे गरजेचे आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या फार कमी आहे. यासाठी मेडिकल कॉलेजची संख्या वाढविणे आवश्यक आहे. यालाच घेऊन मुंबई येथे पब्लिक प्रायवेट पार्टनरशिपच्या (पीपीपी)आधारावर एक पंच तारांकित रुग्णालय तयार होत आहे. येथे ६० टक्के गरीब रुग्णांवर उपचार केले जातील. शासकीय इस्पितळांमधील आरोग्य सेवा सुधारण्याकडेही लक्ष दिले जात आहे. विशेष म्हणजे, चॅरिटेबल ट्रस्ट व स्वयंसेवी संस्थाना आरोग्य क्षेत्राशी जोडण्यासाठी नियमांत बदल केले जात आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. जसपाल अर्नेजा यांनी केले. संचालन डॉ. अंजली व डॉ. प्रशांत भांडारकर यांनी केले. आभार डॉ. मोहजीत अर्नेजा यांनी मानले. (प्रतिनिधी)

हृदय रोगाच्या उपचारासाठी नागपूर ‘बेस्ट’
परिषदेत आलेल्या देशभरातील प्रसिद्ध चिकित्सकांनी हृदय रोगाच्या उपचारासाठी नागपूर उत्कृष्ट (बेस्ट) आहे, असे मनोगत व्यक्त केले. डॉ. अशोक सेठ म्हणाले, नागपुरात माझ्या आईचे शिक्षण झाले. यामुळे या शहराशी माझे कौटुंबिक नाते आहे. कार्डिओलॉजीमध्ये या शहराने मोठी प्रगती केली आहे. येथे हृदयरोग विशेषज्ञांची संख्या सर्वात जास्त आहे, असेही ते म्हणाले. डॉ. रमाकांत पांडा म्हणाले, १९९३ मध्ये डॉ. अर्नेजा यांची भेट झाली. त्यावेळी नागपुरात फारच कमी कॅथलॅब व हृदयरोग विशेषज्ञाची संख्या होती. परंतु आज स्थिती बदलली आहे. हृदय विकारावरील उपचाराच्या संदर्भात नागपुरात हव्या त्या सर्व सोयी उपलब्ध आहेत. ‘नागपूर लाईव्ह’ सारखी परिषद दोन-तीन वर्षातून एकदा तरी व्हावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘मेडिकल टुरिजम’साठी नागपूर योग्य
गडकरी म्हणाले, पाश्चात्त्य देशातील लोकांमध्ये भारतात उपचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हैदराबाद यासाठीच प्रसिद्ध आहे. नागपूर देशाच्या मध्य ठिकाणी आहे. येथील वैद्यकीय क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे. हैदराबादच्या धर्तीवर नागपूर वैद्यकीय पर्यटनासाठी (मेडिकल टूरिजम) योग्य असू शकते. यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

Web Title: Provide health services at cheapest rates to the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.