कृषिपंपाला त्वरित वीज जाेडणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:41+5:302021-07-07T04:09:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील धानाची पऱ्हे व ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील धानाची पऱ्हे व मिरची राेपे सुकण्याच्या मार्गावर आहे. धान पऱ्हे जगविण्यासाठी शेतकरी अक्षरश: धडपड करीत पिकांना हाताने पाणी देत आहेत. दुसरीकडे, शेतात माेटारपंप लावला आहे. मात्र थकीत बिलापाेटी अनेकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. तर काही शेतकऱ्यांना डिमांड भरूनदेखील वीज जाेडणीसाठी तीन-चार वर्षांपासून प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे कृषिपंपाला त्वरित वीज जाेडणी देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.
तालुक्यातील धानला येथील शेतकरी विनाेद हटवार यांनी मे २०१८ ला वीज कंपनीच्या बाेरगाव कार्यालयात अर्ज करून डिमांड भरले. परंतु अद्यापही वीज जाेडणी मिळाली नाही. त्यांनी शेतात मिरचीची लागवड केली. मात्र वीज जाेडणीअभावी पिकाला हाताने पाणी द्यावे लागत असल्याची कैफियत त्यांनी लाेकमतकडे मांडली.
थकीत बिलापाेटी लगेच वीजपुरवठा खंडित केला जाताे. परंतु नवीन वीज जाेडणी वेळेत मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे वीज कंपनीने कृषिपंपाचा वीजपुरवठा कापणे बंद करावे तसेच डिमांडचा भरणा केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ वीज कनेक्श्न देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत झुल्लर येथील शेतकरी नरेश माेटघरे यांच्या नेतृत्वात माैदा विभागाचे कार्यकारी अभियंता रूपेश टेंभुर्णे यांच्याकडे निवेदन साेपविण्यात आले. निवेदन देताना ईश्वर साेनसरे, अनिल साेनसरे, संदीप करंडे, सचिन मस्के, जगन वैरागडे, भाकरू जुमडे, चंद्रभान आखरे, राहुल हटवार, अश्विन वाडीभस्मे, नीलेश साेमनाथे, सूरज पराते, किशाेर कानताेडे, राहुल पाेटभरे, शुभम येळणे आदींसह शेतकरी माेठ्या संख्येत उपस्थित हाेते.