ग्रामीण भागातही वैद्यकीय सेवा द्या
By admin | Published: December 25, 2015 03:47 AM2015-12-25T03:47:52+5:302015-12-25T03:47:52+5:30
वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी गरिबांची सेवा हे उद्दिष्ट ठेवावे. त्यामुळे नवोदित डॉक्टरांनी ग्रामीण भागात कार्य करून चांगली आरोग्य सेवा प्रदान करावी, ...
देवेंद्र फडणवीस : एन.के.पी साळवे वैद्यकीय संस्थेचा रौप्य महोत्सव
नागपूर : वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी गरिबांची सेवा हे उद्दिष्ट ठेवावे. त्यामुळे नवोदित डॉक्टरांनी ग्रामीण भागात कार्य करून चांगली आरोग्य सेवा प्रदान करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
एन. के. पी साळवे वैद्यकीय संस्था व संशोधन केंद्र तसेच लता मंगेशकर हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मातोश्री सभागृहात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृष्णा विद्यापीठाचे कुलपती वेदप्रकाश मिश्रा, संस्थेचे अध्यक्ष रणजित देशमुख, कोषाध्यक्ष आ. आशिष देशमुख, सचिव डॉ. अमोल देशमुख, आ. समीर मेघे, आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. भाऊसाहेब भोगे, गोपाळ दुबे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते एन. के. पी. साळवे यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागरिकांना आरोग्य सेवा व सुविधा पुरविण्याचे कार्य राज्य शासनातर्फे केले जाते. परंतु, या सेवेच्या काही कमतरता भासतात. ग्रामीण भागातील आरोग्य सेवाही शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा एक भाग आहे. यावर उपाय म्हणून आरोग्य सेवेची उत्तम व्यवस्था सार्वजनिक व भागीदारीतून तयार करायला पाहिजे. यासाठी सर्व जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्नआहे. सैनिकी दवाखान्यांप्रमाणे शासन सांगेल त्या ठिकाणी डॉक्टरांना सात वर्षे सेवा द्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, राज्यात मेडिकल, पॅरामेडिकल कॉलेज उघडले जावेत. डॉक्टर हा समाजातील महत्त्वाचा असा घटक असून, त्यांनी ग्रामीण भागापर्यंत पोहचवून ग्रामीण भागाची सेवा करावी.
वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक तरुणाने ग्रामीण भागात जाऊन आरोग्य सेवेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, रणजित देशमुख यांच्यासह अन्य वक्त्यांचीही यावेळी भाषणे झालीत. प्रास्ताविक काजल मित्रा यांनी केले. डॉ. निलोफर मुजावर व डॉ. राखी आंबाडे यांनी संयुक्तरीत्या संचालन केले. (प्रतिनिधी)