धनगरांच्या गाव विकासाकरिता अर्थसंकल्पात निधीची तरतूद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:25 PM2018-03-05T19:25:02+5:302018-03-05T19:25:30+5:30
धनगर वाडा वस्ती व अन्य मागास गावांच्या विकास कामांकरिता राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे राज्यसभा सदस्य खा. डॉ. विकास महात्मे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धनगर वाडा वस्ती व अन्य मागास गावांच्या विकास कामांकरिता राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे राज्यसभा सदस्य खा. डॉ. विकास महात्मे यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना खा. महात्मे यांनी या मागणीसंदर्भात एक सविस्तर पत्रसुद्धा लिहिले आहे. या पत्रात खासदार डॉ. विकास महात्मे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील गावा-गावातून फिरताना असे लक्षात आले की, धनगर वाड्या व वस्तींमध्ये तसेच संलग्नित गावांमध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे. पिण्यासाठी पाणी, रस्ते, नाल्या अशा पायाभूत सुविधा, विद्युत पुरवठा, समाजभवन आदी सुविधा त्यांना अजूनही उपलब्ध झालेल्या नाही. ग्रामीण भागातील विमुक्त व भटक्या जमाती विकासापासून वंचित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनासाठीही अनेक गावांची मागणी आहे. अशी काही वंचित गावे जेथे विकासाची कामे करण्याची नितांत आवश्यकता आहे, अशा काही गावांची नावे मी चिन्हांकित केली असून तेव्हा आगामी अर्थसंकल्पात या गावांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सभागृह बांधण्याकरिता प्रति गाव २० लक्ष रुपये या प्रमाणे तरतूद करावी, जेणेकरून उपरोक्त कामे पूर्णत्वास नेता येतील. आपल्या सरकारचे मुख्य लक्ष्य अंत्योदय हे आहे. ते गाठण्यासाठी हे पाऊल निश्चितच उपयोगी ठरेल, असे स्पष्ट करीत विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्याची विनंतीही पत्राद्वारे केली आहे.