पोलिसांच्या सुविधांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार
By admin | Published: February 7, 2016 03:07 AM2016-02-07T03:07:20+5:302016-02-07T03:07:20+5:30
महाराष्ट्रातील पोलिसांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असून यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात येईल,...
मुख्यमंत्री : कोराडी पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
कोराडी : महाराष्ट्रातील पोलिसांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असून यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कोराडी पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. फित कापून मुख्यमंत्र्यांनी या इमारतीचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. आ. डी. एम. रेड्डी, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. प्रकाश गजभिये, राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, पोलीस आयुक्त एस. पी. यादव, सहपोलीस आयुक्त राजवर्धन, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, कोराडी ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना मैंद, उपसरपंच अर्चना दिवाण, महादुला नगरपंचायतच्या अध्यक्ष कांचन कुथे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात अपराध सिद्धतेचे प्रमाण वाढविण्याच्या प्रयत्नात यश येत आहे. हे प्रमाण आता ४२ टक्क्यांवर गेले आहे. पोलिसांनी अधिक प्रयत्न करुन अपराध सिद्धतेचे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. राज्यात कुणाला कुठेही प्रथम खबरी अहवाल (एफ.आय.आर.) दाखल करण्याची व्यवस्था करण्यात यावी. राज्यातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे. शासन सदैव पोलिसांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
चांगली समाजनिर्मिती होण्यासाठी पोलीस समाजाचा मित्र आहे अशी भावना वाढीस लागण्यासाठी सकारात्मक व गुणात्मक बदल करावा. पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांची मालकी हक्काची घरे व्हावी यासाठीही प्रयत्न होण्याची गरज आहे. राज्य सरकार या कामी विविध सवलती देण्यास कटिबद्ध असल्याचे अभिवचन मुख्यमंत्र्यांनी दिले.
पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी कोराडी पोलीस स्टेशनमधून नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी वृक्षारोपण केले. तसेच कोराडी पोलीस स्टेशनला भेट दिल्याची पोलीस ठाणे दैनंदिनीत नोंद केली. प्रास्ताविक उपायुक्त संजय लाटकर यांनी केले. कार्यक्रमादरम्यान महादुला नगर पंचायतच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, भरत तांगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, अशोक धोटे उपस्थित होते. आभार कोराडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश लोंढे यांनी मानले. (प्रतिनिधी)
कोलार नदीपलीकडील तीन गावांना कोराडी पोलीस ठाण्यात समाविष्ट करा
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी पोलीस स्टेशन हे देशातील अत्याधुनिक व आदर्श पोलीस स्टेशन होण्यासाठी महावितरणतर्फे निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगत कोराडीचा पॉवर प्रोजेक्ट उभा करण्यासाठी पोलिसांची फार मोठी मदत झाली आहे.
कोराडीत तीन हजार मेगावॅटचा पॉवर प्रोजेक्ट तयार होत आहे. त्याचे उद्घाटन एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी केली. सदर पोलीस स्टेशन कोराडी - महादुला गावासाठी अभिमानाची बाब आहे. या पोलीस स्टेशनअंतर्गत कोलार नदीच्या पलिकडील दोन - तीन गावांचा समावेश करावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.