मनोरुग्णांनी फुलवला भाज्यांचा मळा, 5 एकरवर केली शेती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 05:41 AM2021-09-06T05:41:48+5:302021-09-06T05:42:28+5:30
नागपूरमधील आशादायी चित्र : पाच एकरवर केली जाते शेती
सुमेध वाघमारे
नागपूर : बहुतेक मनोरुग्ण गरीब, शेतकरी कुटुंबातील. त्यांना जनावरे, माती-शेतीशी जोडले तर ते लवकर बरे होतात. हा अनुभव लक्षात घेऊन याच अनुभवावर मागील काही वर्षांपासून त्यांच्या परिश्रमावर जवळपास पाच एकरवर केळी व भाज्यांचा मळा फुलला. एकदा रुग्ण मनोरुग्णालयात दाखल झाले की, अखेरच्या श्वासापर्यंत त्याचे आयुष्य दगडी भिंतींआड जाते, असे बोलले जाते. परंतु, नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील चित्र वेगळे आहे. मनोरुग्णालयातील विविध सामाजिक उपक्रमांतून मनोरुग्णांना समाजाशी जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रुग्णालयातील ४० टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. यातील काही बरे झालेल्या व शेतीकामाची आवड असणाऱ्यांना हाताशी धरून त्यांना शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. मनोरुग्णालयातील सुमारे दोन एकरमध्ये भाजीपाला तर टाटा ट्रस्टच्या ‘उडाण’ या उपक्रमातून तीन एकरमध्ये केळीची बाग लावण्यात आली आहे.
नागपूरमधील आशादायी चित्र : पाच एकरवर केली जाते शेती
गेल्या तीन वर्षांत २९ हजार १७८ किलो विविध भाज्या व केळीचे उत्पादन घेतले आहे. सध्या दोन वेळच्या जेवणासाठी लागणारी भाजी याच शेतीतून येते. उरलेला भाजीपाला व फळेविक्रीसाठी पाठवून त्यातील मिळालेला पैसा रुग्णांच्या खात्यात जमा केला जात आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरला आहे. २०१८ मध्ये २७ रुग्णांनी मिळून मेथी, पालक, मुळा, गोडबाजी, टोमॅटो आणि पपई असे एकूण १४६५ किलोचे उत्पादन घेतले. २०१९ मध्ये ५३ मनोरुग्णांच्या प्रयत्नांतून ७३६ किलो तर २०२० मध्ये ३५ मनोरुग्णांच्या कष्टावर २६ हजार ९७७ किलोच्या केळीचे उत्पादन घेण्यात आले. या तीन वर्षांत ११५ मनोरुग्णांच्या परिश्रमातून २९ हजार १७८ किलो केळी व भाज्यांचे उत्पादन काढण्यात यश मिळाले असल्याचे सांगण्यात आले.