रेल्वे स्थानकावर मनोविकृताचा हल्ला, दोघांचा मृत्यू, दोन जखमी
By दयानंद पाईकराव | Published: October 7, 2024 11:54 AM2024-10-07T11:54:36+5:302024-10-07T11:55:31+5:30
Nagpur : फलाटावर झोपलेल्या पाच जणांवर एका माथेफिरूने हल्ला केला. त्यातील दोन जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले.
नागपूर: एका मनोविकृत व्यक्तीने लाकडाच्या जाड पाटीने हल्ला करून केल्यामुळे प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नागपूररेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर सात वर इटारसी एंडकडील भागात रात्री ३ ते ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून लोहमार्ग पोलिसांनी मनोविकृत आरोपीला अटक केली आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील सीतापुर जिल्ह्यात राहणारा केवट नावाचा ४० वर्षाचा मनोविकृत व्यक्ती रात्री तीन वाजताच्या सुमारास डी केबिन परिसराकडून रेल्वे स्थानकाच्या आत शिरला. त्यानंतर त्याने प्लॅटफॉर्मच्या बाजूला असलेली लाकडी मोठी जाड पाटी हातात घेतली. तो प्लॅटफॉर्म नंबर सात वर इटारसी एंड कडील भागात पोहोचला. तेथे काही प्रवासी व भिकारी झोपलेले होते. आरोपी मनोविकृत व्यक्तीने आपल्या हातातील जाड लाकडी पाटीने चौघांना मारण्यास सुरुवात केली. या घटनेत एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका व्यक्तीच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले. हल्ला केल्यानंतर मनोविकृत आरोपी रेल्वे स्थानक परिसरातच फिरत होता. दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.