नागपुरात प्रेमप्रकरणातून तरुणीवर हल्ला चढवणारा माथेफिरू गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:26 PM2018-07-03T14:26:43+5:302018-07-03T14:30:00+5:30
लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) नामक तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणारा माथेफिरू रोहित मनोहर हेमनानी (वय २१) याला बजाजनगर पोलिसांनी अखेर अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) नामक तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणारा माथेफिरू रोहित मनोहर हेमनानी (वय २१) याला बजाजनगर पोलिसांनी अखेर अटक केली. त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत होते. मात्र, तो उल्हासनगर येथे दडून बसला होता. पोलिसांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्याला नागपूरकडे येण्यास बाध्य करून बडनेरा (जि. अमरावती) स्थानकावर अटक केली.
आरोपी हेमनानी खामल्यातील सिंधी कॉलनीतील रहिवासी आहे. लक्ष्मीनगरातील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सानिकासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपासून तो सानिकावर संशय घेऊ लागल्याने तिने त्याला टाळणे सुरू केले. यातून दोघांत वाद झाला अन् त्यांचे ब्रेकअपही झाले. मात्र, शेवटचे एकदा भेटू असे म्हणून आरोपी हेमनानीने तिला रविवारी १ जुलैला वारंवार फोन केले. त्यामुळे तिने त्याला तिचे मामा अविनाश पाटणे यांच्या फायनान्स कार्यालयात येण्यास सांगितले. तेथे आल्यानंतर त्याने तिला बाहेर चलण्याचा आग्रह धरला. मात्र, सानिकाने मामा-मामींच्या उपस्थितीतच जे काय बोलायचे ते बोल, असे त्याला सुनावले. त्यानंतर त्याने सानिकाला ‘तू माझ्याशी संबंध का तोडले’, असा प्रश्न करून तिच्याशी वाद घातला. हे सुरू असताना काही कळायच्या आतच लपवून ठेवलेला कट्यारसारखा चाकू बाहेर काढून आरोपीने सानिकावर सपासप घाव घातले. छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे घाव बसल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. ते पाहून तिचे मामा अविनाश मध्ये धावले असता आरोपीने त्यांच्याही हातावर चाकू मारला. अशा प्रकारे दोघांवर हल्ला केल्यानंतर आरोपी हेमनानी पळून गेला. अत्यंत वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली. गंभीर अवस्थेतील सानिकाला देवनगरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.
मध्यस्थाची मदत झाली
दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी बजाजनगर तसेच गुन्हे शाखेची पथके ठिकठिकाणी शोधाशोध करीत होती. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी खामल्यातील सामाजिक कार्यकर्त्यांकडेही संपर्क केला. सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपीच्या आईवडिलांना आरोपीला तातडीने पोलिसांच्या हवाली केले नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, असा दम दिल्याने दिला. दरम्यान, सोमवारी दुपारी आरोपीच्या आईवडिलांना आरोपीच्या मावसभावाचा फोन आला. रोहित हेमनानी उल्हासनगर (ठाणे) मध्ये असून, त्याला पैशाची गरज असल्याचे सांगितले. ही माहिती कळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधून त्याला नागपूरकडे पाठविण्यास बजावले. इकडे पोलिसांसोबत आरोपीच्या मामाला पाठविण्यात आले. रात्री उशिरा आरोपी बडनेरा स्थानकावर पोहचताच मामाने त्याला खाली उतरवून घेतले आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. मंगळवारी सकाळी आरोपीला नागपुरात आणण्यात आले. वृत्त लिहेस्तोवर त्याची चौकशी सुरू होती.