सायकोच्या लवकरच मुसक्या बांधू - पोलीस महासंचालक

By admin | Published: February 7, 2017 11:51 PM2017-02-07T23:51:09+5:302017-02-07T23:51:09+5:30

महिला-मुलींवर चाकूहल्ला करून उपराजधानीत प्रचंड दहशत निर्माण करणाºया सायकोला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केली आहे.

Psycho bites soon - Police Director General | सायकोच्या लवकरच मुसक्या बांधू - पोलीस महासंचालक

सायकोच्या लवकरच मुसक्या बांधू - पोलीस महासंचालक

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 07 -  महिला-मुलींवर चाकूहल्ला करून उपराजधानीत प्रचंड दहशत निर्माण करणाºया सायकोला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केली आहे. लवकर त्याच्या मुसक्या बांधण्यात येईल, असा विश्वास पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त भागाची स्थिती जाणून घेण्यासाठी पोलीस महासंचालक माथूर मंगळवारी नागपुरात आले होते. पोलीस आयुक्तालयात गाठून पत्रकारांनी त्यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, उपराजधानीत दहशत निर्माण करणाºया सायकोला पकडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येत पोलीस पथके सायकोचा शोध घेत असून, मोठ्या प्रमाणावर गुप्तचर रात्रंदिवस सायकोची माहिती काढण्याच्या कामी लागले आहेत. पोलीस नेमके काय करीत आहेत, ते सांगणे योग्य होणार नाही. मात्र, सायकोच्या मुसक्या बांधण्यासाठी केलेल्या उपाययोजनांवर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम स्वत: नजर ठेवून आहेत. लवकरच तो तुम्हाला पोलिसांच्या कोठडीत दिसेल, असेही माथूर म्हणाले. सायकोच्या भीतीमुळे महिला-मुलींनी कामावर जाणे, बाहेर निघणे बंद केले असून, मोठ्या प्रमाणात अफवा पसरत असल्याने भीती गडद होत असल्याचे लक्षात आणून दिले असता त्यांनी  सोशल मीडियावरून पसरत असलेल्या अफवावर नियंत्रण ठेवणे थोडे कठीण असल्याचे सांगितले. मात्र, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, काही माहिती मिळाली तर लगेच पोलिसांना कळवावे. सायकोला पकडण्यासाठी दक्षिण नागपुरात जागोजागी सापळे लावले आहे. मतदानापूर्वीच त्याच्या मुसक्या बांधण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही  परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
 
आयुक्तालयात सायकोवरच चर्चा
शहरभर दहशत निर्माण करणाºया सायकोने पोलिसांनाही हैराण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस आयुक्तालयात सायकोच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कोणत्याही स्थितीत त्याला तातडीने अटक करा, असे आदेश पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी पोलीस अधिका-यांना दिले. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी पोलीस महासंचालक माथूर यांनी आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतली. त्यांनी सायकोला अटक करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहे, त्याचा आढावा घेतला. येथील अधिकाºयांकडून माहिती ऐकून घेतल्यानंतर महासंचालकांनी विशेष सूचना केल्या. 
 
महिलांचा रोष, सहआयुक्तांचा दिलासा
सायकोमुळे दहशतीत आलेल्या महिलांनी सहपोलीस शिवाजी बोडखे यांची भेट घेतली. सायकोला लवकर अटक करा आणि महिलांना आश्वस्त करा, अशी मागणी या महिलांनी सहआयुक्तांकडे केली. सहआयुक्त बोडखे यांनी महिलांच्या भावना ऐकून घेत त्यांना दिलासा दिला. घाबरू नका, अफवांवर विश्वासही ठेवू नका.  तुम्हाला काही संशयास्पद वाटत असेल तर लगेच पोलिसांना माहिती द्या, असे म्हणत त्यांनी महिलांना व्हॉटसअ‍ॅप नंबर दिला. पोलीस तुमच्या सोबत आहेत. सायकोला आम्ही लवकरच गजाआड करणार आहोत, असा विश्वासही सहआयुक्तांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, सहआयुक्त बोडखे यांनी सोमवारी सायंकाळी अजनीत झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी भेट देऊन त्या भागातील नागरिकांशी चर्चा केली आणि नंतर पोलीसांना तपासासंदर्भात टीप्स दिल्या. 
 
अख्खी यंत्रणाच सायकोच्या शोधात 
अफवांचे बॉम्ब फुटत असल्याने सायकोची दहशत तीव्र झाली आहे. नागरिकांमध्येही प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे नाथजोगी हत्याकांडासारखी घटना घडून निर्दोष व्यक्तीचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोलीस महासंचालकांच्या ध्यानात हा प्रकार आणून देण्यात आला आहे. ते लक्षात घेता पोलिसांनी सायकोच्या मुसक्या बांधण्याचे प्रयत्न अधिक तीव्रतेने चालवले आहेत. सोमवारपर्यंत दोनशे ते अडीचशे पोलीस सायकोचा शोध घेत होते. आजपासून पाचशेंपेक्षा जास्त पोलीस सायकोच्या मुसक्या बांधण्यासाठी कामी लावण्यात आले आहे. अफवा पसरणार नाही, त्यासाठी पोलीस जागोजागी बैठका घेऊन नागरिकांचे समुपदेशन करीत असून, त्यांना सहकार्याचेही आवाहन करीत आहेत. 

Web Title: Psycho bites soon - Police Director General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.