नकली आई-वडिलांना सोपविली मनोरुग्ण तरुणी
By admin | Published: January 11, 2016 02:44 AM2016-01-11T02:44:55+5:302016-01-11T02:44:55+5:30
घरून बेपत्ता झालेली एक स्थानिक मनोरुग्ण तरुणी उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेसंकटात सापडली आहे....
यूपी पोलिसांचे कृत्य : नातेवाईक फिरताहेत दारोदारी
जगदीश जोशी नागपूर
घरून बेपत्ता झालेली एक स्थानिक मनोरुग्ण तरुणी उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेसंकटात सापडली आहे. दोन आठवड्यांपासून तरुणीचे आई-वडील मदतीसाठी दारोदार भटकत आहेत. निशा गौरीशंकर इटनकर (२०) रा. पाचपावली असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. निशाचे वडील मजुरी करतात तर आई शिवणकाम करते. घरी आई-वडिलांसह मोठी बहीण आणि एक भाऊ आहे. निशा आणि तिच्या मोठ्या बहिणीची मानसिक अवस्था चांगली नाही. २० डिसेंबर रोजी दुपारी निशा घरून अचानक निघून गेली. काही वेळानंतर ती दिसून येत नसल्याचे आईच्या लक्षात आले. खूप शोध घेऊनही मुलीचा पत्ता लागला नसल्याने ते काळजीत पडले. निशा यापूर्वीसुद्धा दोन-तीनवेळा बेपत्ता झाली होती. जागरूक नागरिक तिला तिच्या आई-वडिलांकडे आणून देत होते. कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंंदविली होती. ती नेहमीप्रमाणे सुखरूप परत येईल, असा घरच्यांना विश्वास होता. २१ डिसेंबरला रात्री निशा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सापडली. उन्नाव येथील व्ही.के. राजपूत नावाच्या व्यक्तीला ती दिसली. निशाची अवस्था पाहून ती भटकून शहरात आल्याचे लक्षात आले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने एका मंदिरात निशाची राहण्याची व्यवस्था केली. २२ डिसेंबरला उन्नाव पोलिसांना महिती देण्यात आली. राजपूत यांनी निशाच्या आई-वडिलांना फोन केला आणि निशा उन्नाव येथे असल्याची माहिती दिली. ठाण्यात येऊन आपल्या मुलीला घेऊन जाण्यास सांगितले. २२ डिसेंबर रोजी राजपूत यांनी निशाला उन्नाव येथील कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले. आर्थिक अडचण असल्याने निशाच्या आई-वडिलांनी उन्नावला जाण्यासाठी पैशाची जमवाजमव करू लागले. यात एक दिवस निघून गेला. ते २५ डिसेंबरला सायंकाळी उन्नाव येथील कोतवाली ठाण्यात पोहोचले. तिथे शुक्ला नावाच्या महिला ठाणेदार होत्या. त्यांनी निशाला तिच्या आई-वडिलांकडे सोपविल्याची माहिती दिली. ठाणेदाराची गोष्ट ऐकून निशाच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी ठाणेदाराला तेच निशाचे खरे आई-वडील असल्याचे सांगितले. त्यासंबंधीचे पुरावेसुद्धा दिले. निशाला घेऊन जाणाऱ्यांचे नाव विचारले असता ठाणेदार कुठलेही उत्तर देऊ शकल्या नाही. निशाच्या वडिलांनी राजपूत यांच्याशी संपर्क साधला. राजपूत यांनी दबाव टाकल्यावर ठाणेदाराने चुकीने संबंधितांकडून आई-वडील असल्याचे दस्तऐवज न घेतल्याचे सांगितले. त्यांचे नाव व पत्ताही पोलिसांनी लिहून घेतला नव्हता. चूक झाल्याची कबुली देत निशाला शोधून काढण्याचे आश्वासन देत शांत राहण्यास सांगितले. उन्नाव येथे कुणीच मदत करणारा नसल्याने निशाचे आई-वडील नागपूरला परत आले.
या घटनेला २० दिवस लोटले आहे. निशाचा कुठलाही पत्ता लागलेला नाही. गरीब आणि अशिक्षित निशाच्या आई-वडिलांची मदत करायलाही कुणी तयार नाही. त्यांनी नगरसेविका आभा पांडे यांची भेट घेऊन आपबिती सांगितली. पांडे यांनी उन्नाव पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी निशाचा शोध सुरू असल्याचे सांगितले.
आभा पांडे यांच्याकडून आर्थिक मदत घेऊन निशाचे आई-वडील पुन्हा उन्नावला गेले. या प्रकरणात सर्वस्वी उन्नावच्या ठाणेदाराची चुकी आहे. वरिष्ठ अधिकारी ठाणेदाराला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मनोरुग्ण असल्याने निशासोबत काही अनुचित घटना होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
उपचारासाठी विकले घर
इटनकर दाम्पत्यांची २१ वर्षांची मोठी मुलगीसुद्धा मनोरुग्ण आहे. तिला येथे एकटी सोडून जाणे धोक्याचे असल्याने ते तिलासुद्धा सोबत घेऊन गेले. मुलींच्या उपचारासाठी इटनकर दाम्पत्यांनी आपले वडिलोपार्जित घरसुद्धा विकले. स्वत: काबाडकष्ट करून ते मुलींचा सांभाळ करीत आहेत. त्यांना एक मुलगाही आहे. तोसुद्धा मजुरी करतो.
तथ्यांची होणार चौकशी
उन्नावचे पोलीस अधीक्षक पवन कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, त्यांना या प्रकरणाची माहिती नाही. ठाणेदाराकडून माहिती घेऊन तथ्याच्या आधारावर चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.