नागपुरात पब्जीने घेतला विद्यार्थ्याचा बळी; गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 04:18 PM2020-07-09T16:18:32+5:302020-07-09T16:19:21+5:30

नागपुरात पब्जीच्या आहारी गेलेल्या एका विद्यार्थ्याने बुधवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली.

Pubji kills student in Nagpur; Suicide by hanging | नागपुरात पब्जीने घेतला विद्यार्थ्याचा बळी; गळफास लावून आत्महत्या

नागपुरात पब्जीने घेतला विद्यार्थ्याचा बळी; गळफास लावून आत्महत्या

Next
ठळक मुद्देपुण्यात हॉटेल मॅनेजमेंट शिकायचा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पब्जीच्या आहारी गेलेल्या एका विद्यार्थ्याने अखेर गळफास लावून आत्महत्या केली. रितिक किशोर ढेंगे (वय १९) असे त्याचे नाव असून तो अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुना फुटाळा कॉर्पोरेशन लाईनजवळ राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितिकचे वडील एका शिक्षण संस्थेत सेवारत असून आई गृहिणी आहे. रितिकला एक लहान भाऊ आहे. तो पुण्याच्या एका कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम शिकत होता. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर तो नागपुरात आपल्या घरी परतला. त्यानंतर तो रात्रंदिवस मोबाईलमध्ये व्यस्त राहायचा. कुटुंबातील सदस्यांनी लक्ष घातले असता तो सारखा पब्जी गेम खेळत असल्याचे त्यांना कळले. वडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नव्हता.

तो पब्जीच्या एवढा आहारी गेला होता की खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून तो रात्रंदिवस पब्जीच खेळत राहायचा. त्यामुळे त्याला भयंकर डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता. पब्जी खेळला नाही तर तो असामान्य वागायचा आणि पब्जी खेळत असला की त्याचे डोके दुखायचे. त्याच्या या समस्येमुळे ढेंगे कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. नातेवाईकांचा सल्ला घेतल्यानंतर रितिकचे वडील किशोर ढगे यांनी त्याचा उपचार एका डॉक्टरांकडे सुरू केला. मात्र तो दाद देत नव्हता. उपचार घेत असतानाही तो मोबाईलवर व्यस्त असायचा. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास रितिकने घरात गळफास लावून घेतला. घरच्यांना ते दिसल्यानंतर त्यांनी लगेच त्याला खाली उतरवले आणि उपचाराकरिता खासगी इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी रितिकला तपासून मृत घोषित केले.

मिळालेल्या सूचनेवरून अंबाझरीचे ठाणेदार विजयी करे यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांना त्याच्या घरी पाठविले. रितिकच्या घराची तपासणी करण्यात आली. मात्र त्याच्याकडे मोबाईल व्यतिरिक्त काहीही आढळले नाही. त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहून ठेवली नाही, असे तपास अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक गोपिका कोडापे यांनी सांगितले. रितिकचे वडील किशोर मनोहर ढेंगे यांनी पोलिसांना माहिती देताना रितिकला पब्जीचा नाद होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

कुटुंबीयांना मानसिक धक्का
रितिक हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. पुण्याला शिकायला जाण्यापूर्वी त्याला कसलाही नाद नव्हता. मात्र पुण्याहून परतल्यानंतर तो रात्रंदिवस पब्जी खेळत राहायचा आणि त्याचमुळे त्याला जीव गमवावा लागला. त्याच्या आत्मघाती पावलामुळे रितिकचे आई-वडील आणि छोट्या भावाला जोरदार मानसिक धक्का बसला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Pubji kills student in Nagpur; Suicide by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.