जनजागृतीमुळे कॅन्सरवर अंकुश शक्य

By admin | Published: April 27, 2017 02:35 AM2017-04-27T02:35:06+5:302017-04-27T02:35:06+5:30

अद्ययावत तंत्रज्ञान व उपचार पद्धतीमुळे कॅन्सर जीवघेणा आजार राहिलेला नाही. तरीही पहिल्या टप्प्यातच कॅन्सरचे निदान

Public awareness can curb cancer | जनजागृतीमुळे कॅन्सरवर अंकुश शक्य

जनजागृतीमुळे कॅन्सरवर अंकुश शक्य

Next

परिसंवादात विशेषज्ञांचा सूर : शासकीय रुग्णालयांमध्ये असावी कॅन्सरवरील उपचाराची सोय
नागपूर : अद्ययावत तंत्रज्ञान व उपचार पद्धतीमुळे कॅन्सर जीवघेणा आजार राहिलेला नाही. तरीही पहिल्या टप्प्यातच कॅन्सरचे निदान होऊन उपचार झाल्यास त्याची गंभीरता कमी होऊ शकते. शासकीय रुग्णालयांमध्ये कॅन्सरच्या अद्ययावत उपचाराची सोय व्हायला हवी. रुग्णाला विश्वासात घेऊन त्याचे समुपदेशन करून उपचार करणे आवश्यक आहे; सोबतच कॅन्सरविषयी गैरसमजही दूर करणे गरजेचे आहे. कॅन्सरच्या लक्षणांची, त्याच्या आजाराची माहिती केवळ शहरातच नव्हे तर गावखेड्यांमध्येही पोहोचविणे महत्त्वाचे आहे. विशेषत: तंबाखूच्या वापरावर बंदी यायला हवी, असा सूर ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ या ब्रीद वाक्याला घेऊन लोकमत आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने आयोजित ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ या उपक्रमातील परिसंवादात विशेषज्ञांचा होता.

या परिसंवादात कोकिलाबेन रुग्णालयाचे कन्सल्टंट ब्रेस्ट अ‍ॅण्ड कोलोरॅक्टल आॅन्कॉलॉजी विशेषज्ञ डॉ. मंदार नाडकर्णी, कोकिलाबेन रुग्णालयाच्या आॅन्कॉलॉजीचे संचालक डॉ. राजेश मिस्त्री, आयएमए नागपूरच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्करोग विभागाचे डॉ. कृष्णा कांबळे, स्नेहांचल पॅलिअ‍ॅटिव्ह केअर सेंटरच्या अध्यक्ष डॉ. रोहिणी पाटील, सायको आॅन्कॉलॉजिस्ट एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटरच्या डॉ. सुचित्रा मेहता, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे सहसंचालक डॉ. बी.के. शर्मा आदी सहभागी झाले होते. परिषदेत या विशेषज्ञांनी कॅन्सरची लक्षणे, जनजागृती उपाय, गैरसमज, समुपदेशनाचे महत्त्व, रुग्णांची स्थिती, शासकीय इस्पितळांमधील समस्यांवर प्रकाश टाकला.
यावेळी उपस्थित विशेषज्ञाचा सत्कार लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. (प्रतिनिधी)

ग्रामीण भागात कॅन्सरच्या जनजागृतीची गरज : डॉ. खंडाईत
डॉ. वैशाली खंडाईत म्हणाल्या, ग्रामीण भागात योग्य वैद्यकीय सेवा व शिक्षणाची फार गरज आहे. विशेषत: ग्रामीण महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. यातच त्यांचे शिक्षण कमी असल्याने कॅन्सरच्या लक्षणाविषयी त्यांना फार कमी माहिती असते. परिणामी, कॅन्सरच्या तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये महिला डॉक्टरांजवळ जातात. तेव्हापर्यंत बराच उशीर झालेला असतो. ग्रामीण भागात केवळ शिबिर आयोजित करून होणार नाही, तर येथील महिला व पुरुषांना याचे शिक्षण देणे महत्त्वाचे ठरेल. याशिवाय शासकीय रुग्णालयांमध्ये कॅन्सरच्या उपचारासाठी आवश्यक उपकरण व तज्ज्ञाची सोय उपलब्ध करून देणे तेवढेच आवश्यक आहे. ‘आयएमए’च्यावतीने महिलांच्या आरोग्य तपासणीची मोहीम चालविल्या जाईल, असेही त्या म्हणाल्या.


शासकीय रुग्णालयांमध्ये असाव्या अद्ययावत सोयी : डॉ. कांबळे
डॉ. कृष्णा कांबळे म्हणाले, कॅन्सरवरील उपचारासाठी विदर्भच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण नागपूरच्या मेडिकलमध्ये येतात. रुग्णालयात या रुग्णांची गर्दी वाढतच चालली आहे. नागपूर मेडिकल कॉलेज शैक्षणिक संस्था आहे. गाव व तहसीलस्तरावरील शासकीय इस्पितळांमध्येही कॅन्सरवर उपचाराची व्यवस्था झाल्यास या रुग्णालयावरील भार कमी होईल. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांनी १३० प्रकारच्या गुटख्यांचे नाव सांगितले, तर मुरमाडी गावांत खायचे तेल नाही परंतु तंबाखूची तीन दुकाने आहेत. यावरून आपल्यापेक्षा तंबाखूचे जास्त नेटवर्क आहे. ते म्हणाले, कॅन्सरवर महिनोन्महिने उपचार चालतात. यामुळे कॅन्सरवर नि:शुल्क उपचार केला तरी ६५ टक्के निधी रुग्णाला स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागतो. नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट होण्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी १२० कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु अद्यापही हा निधी मिळालेला नाही. कॅन्सरच्या उपचारासाठी अनेक इस्पितळे उघडत आहेत. परंतु गरीब रुग्ण येथे जाऊ शकत नाही. यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये अद्ययावत सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सोबतच डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधल्यास ५० टक्के आजार बरा होतो, असेही ते म्हणाले.

Web Title: Public awareness can curb cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.