पहिले कोरोनाबाधित दाम्पत्य करतेय रुग्णांची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:26 AM2020-12-14T04:26:10+5:302020-12-14T04:26:10+5:30
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात होत नाही तोच नागपुरात पहिला रुग्ण आढळून आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रुग्णाची पत्नी आणि ...
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात होत नाही तोच नागपुरात पहिला रुग्ण आढळून आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रुग्णाची पत्नी आणि दोन मित्रही पॉझिटिव्ह आले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. डॉक्टरांसमोरही मोठे आव्हान होते. परंतु रुग्णालयाचे शर्थीचे प्रयत्न व रुग्णांनी उपचाराला दिलेली साथ यामुळे काहीच दिवसात त्यांनी कोरोनावर मात केली. त्यानंतर त्यांनी कोरोनाची जनजागृतीची मोहिमच हाती घेतली. मागील आठ महिन्यापासून हे दाम्पत्य धास्तावलेल्या रुग्णांना हिंमत देत आहेत.
एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणारा नागपुरातील ४८ वर्षांचा अधिकारी मार्च महिन्यात नागपुरातील चार सहकाऱ्यांसह बैठकीसाठी अमेरिकेतील ॲटलांटा येथे गेला होता. बैठक आटोपल्यावर वॉशिंग्टन मार्गे ६ मार्चला नागपुरात परतला. १० मार्चला ताप आल्याने हा रुग्ण मेयोत दाखल झाला. ११ मार्चला त्याच्या घशातील स्रावाचे नमुने तेथीलच प्रयोगशाळेत तपासले असता अहवाल पॉझिटिव्ह आला. नागपुरात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद होताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. त्यानंतर हळूहळू रुग्णात वाढ होत गेली. या नऊ महिन्यात १,१७,२११ बाधित रुग्णांची नोंद झाली.
- रुग्णांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत दाम्पत्य
पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी व त्याच्या जवळचे नातेवाईक, मित्र असे १३ जणांना मेडिकल रुग्णालयात दाखल करून त्यांचे नमुने घेण्यात आले. यापैकी पत्नी तसेच पहिल्या रुग्णासोबत गेलेले दोन अधिकारी बाधित आले. यातही पतीवर मेयोमध्ये तर पत्नीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. १४ दिवसाच्या उपचारानंतर रीतसर घेतलेल्या चाचण्यांमध्ये २६ मार्चला दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाईन राहिले. परंतु तेव्हापासूनच या दाम्पत्याला सुरुवातीला परिचितांचे तर नंतर अनोळखी रुग्णांचेही फोन येऊ लागले. काय काळजी घ्यावी, दिनचर्या कशी असावी, आहार कोणता घ्यावा, असे अनेक प्रश्न विचारू लागले. हे दाम्पत्यही वेळ काढून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत.
:: ११ मार्च रोजी आढळला जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह
:: प्रत्येक महिन्याला असे वाढले रुग्ण
-महिन्यानुसार रुग्णसंख्या
महिना रुग्ण
मार्च १६
एप्रिल १३८
मे ५४१
जून१,५०५
जुलै५,३९२
ऑगस्ट २९,५५५
सप्टेंबर७८,०१२
ऑक्टोबर १,०२,७८६
नोव्हेंबर १,११,७६५