प्रसार माध्यमांनी मानवाधिकाराची जनजागृती करावी
By admin | Published: September 15, 2015 06:08 AM2015-09-15T06:08:28+5:302015-09-15T06:08:28+5:30
मानवाला नैतिक जीवन जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मानवाधिकार हक्कांची आवश्यकता आहे. यात प्रसार
नागपूर : मानवाला नैतिक जीवन जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मानवाधिकार हक्कांची आवश्यकता आहे. यात प्रसार माध्यमांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मानवाधिकारांच्या रक्षणासाठी तसेच जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कार्यवाहक अध्यक्ष न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) सिरियाक जोसेफ यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय समाज, मीडिया व मानव अधिकारांसमोरील आव्हाने : एक संवाद’ या विषयावरील दोन दिवसीय परिसंवादाचे सोमवारी उद्घाटन झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
विद्यापीठ संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिसंवादादरम्यान व्यासपीठावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य शरदचंद्र सिन्हा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, मानवाधिकार आयोगाचे सहायक संचालक डॉ. सरोजकुमार शुक्ला, सहसचिव डॉ. रंजित सिंह, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. अधरा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. मानवाने मानवाचा सन्मान राखून त्यांच्या अधिकारावर गदा आणायला नको म्हणून मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. मानवी हक्काविषयी प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक सिद्धांत विकसित झालेले आहेत. मानवाला मिळालेल्या निसर्गदत्त हक्कांना हिरावून घेतलं जाऊ नये ही मानवाधिकाराची जबाबदारी आह,े असे प्रतिपादन जोसेफ यांनी केले. मानवी जीवनावर प्रसार माध्यमांचा फार मोठा प्रभाव आहे. एका अर्थाने प्रसार माध्यमं ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी समाजकार्याची भूमिका जिवंत ठेवावी, असे मत प्रा. गिरीश्वर मिश्रा यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रंजित सिंह यांनी तर आभार डॉ. अधरा देशपांडे यांनी मानले.(प्रतिनिधी)