सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट तर घरगुती गणपती २ फुटांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:29+5:302021-09-07T04:11:29+5:30
मिरवणुकीवर बंदी, गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या संसर्ग वाढीला गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी ...
मिरवणुकीवर बंदी, गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संसर्ग वाढीला गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी कारणीभूत ठरू नये. यासाठी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातही मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यानुसार गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा घालण्यात आली असून सार्वजनिक मंडळाची गणेशमूर्ती ४ फूट, तर घरगुती गणपती २ फुटांपर्यंत ठेवता येईल.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.
सुसंगत व मर्यादित मंडप उभारावे.
सार्वजनिक मंडळाची सजावट साधी असावी.
सार्वजनिक मंडळाची गणेशमूर्ती ४ फूट तर घरगुती गणपती २ फुटांचा असावा.
शक्यतो घरातील धातू, संगमरवर या मूर्तीचे पूजन करावे.
शाडूची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती असल्यास घरी विसर्जन करावे.
शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्तीचे घरच्या घरी वा कृत्रिम तलावात विसर्जन करावे.
घरी विसर्जन शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनाच्या स्थळी विसर्जन करावे.
गणपती आणताना वा विसर्जनासाठी मिरवणूक काढता येणार नाही.
नागरिक देतील ती देणगी मंडळांनी स्वीकारावी.
मंडप परिसरात गर्दी होऊ देऊ नये.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे, रक्तदान यांच्या आयोजनावर भर द्यावा.
आरती, भजन, कीर्तन करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
गणेश मंडळांनी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी वेबसाइट, ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुकद्वारे दर्शनाची सोय करावी.
गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी.
एकाच इमारतीतल्या अनेक घरगुती गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.