स्वच्छ हवा योजनेसाठी जनसहभाग महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 01:20 AM2020-07-12T01:20:55+5:302020-07-12T01:22:18+5:30
महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या नागपूर शहराच्या स्वच्छ हवा कृती योजनेच्या प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महानगरपालिका यांसोबत शहरामध्ये वायू प्रदूषणावर काम करणाऱ्या संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या नागपूर शहराच्या स्वच्छ हवा कृती योजनेच्या प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महानगरपालिका यांसोबत शहरामध्ये वायू प्रदूषणावर काम करणाऱ्या संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी व्यक्त केले.
कोरोनानंतर शहरातील ‘हवेचा दर्जा सुधारण्यासाठीच्या कृती आराखड्याची निश्चिती’ या विषयावर नुकतेच ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेण्ट (सीएफएसडी) आणि वातावरण फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिषदेत अनेक मान्यवर तज्ज्ञांचा सहभाग होता. यामध्ये नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, व्हीएनआयटीच्या स्थापत्यशास्त्र व नगर नियोजन विभागाचे सहायक प्रा. समीर देशकर, विदर्भ पर्यावरण कृती समितीचे संयोजक सुधीर पालिवाल, सीएफएसडीच्या संचालिका लीना बुद्धे, सीईईडब्ल्यूच्या प्रोग्राम असोसिएट तनुश्री गांगुली, वातावरण फाऊंडेशनचे संस्थापक भगवान केसभट आदींचा सहभाग होता. यावेळी मंडळाच्या वेबसाईटवरील १०२ शहरांच्या स्वच्छ हवा कृती आराखड्याचे विश्लेषण करण्यात आले. लीना बुद्धे यांनी लोकांना जागरूक ठेवून प्रदूषणमुक्त शहराच्या अंमलबजावणीसाठी त्यांनाच सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. शिवाय महापौर आणि लोकप्रतिनिधींनाही कृती समितीचे सदस्य बनविल्यास जबाबदारी निश्चित होईल, असेही त्या म्हणाल्या. सुधीर पालिवाल यांनी या मागणीला दुजोरा देत लोकांसाठी योजना राबविताना लोकांचाच विचार केला जात नसल्याची खंत व्यक्त केली.
परिषदेदरम्यान आंतरविभागीय आणि आंतरराज्यीय समन्वय प्रणालीसोबतच वातावरणीय आणि तत्कालीन प्रदूषणाची एकात्मिक शहरनिहाय माहिती उपलब्ध करणे आणि पायाभूत सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था उभी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. शहरनिहाय लक्ष्य ठरवावे आणि त्यातील प्रत्येक कृती धोरणाचा स्वतंत्र आर्थिक गरजांनुसार विचार केला जावा. डॉ. राकेश कुमार म्हणाले, कोविड लॉकडाऊन काळात अनेक नव्या गोष्टी आपण कशा शिकलो, हवेतील प्रदूषणाशी दोन हात करण्यासाठी सामान्य लोकांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. हेमा देशपांडे यांनी, लॉकडाऊन काळात शहरातील प्रदूषणात कमालीची घट झाल्याचा उल्लेख करीत यानुसार धोरण ठरवावे लागेल, अशी भावना व्यक्त केली. समीर देशकर यांनी प्रदूषणमुक्त वाहतुकीला चालना महत्त्वाची असून त्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुदृढ व प्रभावी करण्याचे मत व्यक्त केले.