जनसेवेचे व्रत!
By admin | Published: July 30, 2014 01:19 AM2014-07-30T01:19:18+5:302014-07-30T01:19:18+5:30
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाची स्थापना कस्तुरचंदजी डागा यांनी केली. याला आज १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी लावलेल्या २० खाटांच्या छोट्याशा रोपट्याचे ५०० खाटांच्या विशाल वटवृक्षात रूपांतर
२० खाटांचे रोपटे झाला ५०० खाटांचा वटवृक्ष
सुमेध वाघमारे -नागपूर
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाची स्थापना कस्तुरचंदजी डागा यांनी केली. याला आज १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी लावलेल्या २० खाटांच्या छोट्याशा रोपट्याचे ५०० खाटांच्या विशाल वटवृक्षात रूपांतर होत आहे. १९५६ साली शासनाने ही संस्था अधिग्रहित करून स्त्रिया व बालकांकरिता सर्वंकष सेवा देण्याबाबत कस्तुरचंदजी यांच्यासोबत केलेला करार कायम ठेवल्याचे हे वास्तव आहे.
मातेच्या आरोग्याची निगा राखून देशाची भावी पिढी सशक्त करण्यासाठी दानशूर समाजसेवी कस्तुरचंदजी डागा यांनी १८८९ साली नागपूर शहराच्या मध्यभागी व अत्यंत गजबजलेल्या भागात डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाची स्थापना केली. त्यावेळी रुग्णालयात फक्त २० खाटा होत्या. त्यावेळी ‘डग्लस रुग्णालय’ असे नाव होते. काळाची गरज ओळखून स्वत: डागाजी यांनी हे रुग्णालय महिला व बालकांकरिताच ठेवण्यात यावे या अटीवर पाच एकर जागेसह शासनाला फेब्रुवारी १९५६ साली रुग्णालय व जमीन हस्तांतरित केले. शासनाने या रुग्णालयाचे नाव ‘डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय’ असे नामकरण करून ३३५ खाटांची मंजुरी दिली. या परिसरात रुग्णालय प्रशासकीय कार्यालय, सुश्रुषा प्रशिक्षण केंद्र अशा एकूण १२ इमारती उभ्या झाल्या.
डॉ. खेडीकर यांच्या नेतृत्वात सर्वात जास्त बाळंतपणे
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २००८ पासून डागा स्मृती शासकीय रुग्णालयास भारतीय सार्वजनिक आरोग्य प्रमाणक दर्जा प्राप्त झाला. तसेच या कार्यक्रमांतर्गत निरनिराळ्या नवनवीन योजना रुग्णालयास मंजूर झाल्या. याच वर्षी वैद्यकीय अधीक्षिका म्हणून प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. वैशाली खेडीकर रुजू झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनात या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली. डॉ. खेडीकर आणि त्यांच्या सर्व टीमने अथक प्रयत्न करून डागा रुग्णालयामध्ये महाराष्ट्रात सर्वात अधिक बाळंतपणे केली. यासोबतच मातामृत्यू दर आणि कमी वजनांच्या बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
राज्यासाठी
एक आदर्श
नर्सिंग बळकटीकरण असो किंवा ‘अर्श क्लिनिक असो.’ संस्थेने दिलेल्या प्रत्येक बाबीवरील अनुदानाचा १०० टक्के उपयोग करण्यात आला. यामुळे आहे त्या मनुष्यबळामध्ये रुग्णसेवेचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत गेला. शासनाने याची वेळोवेळी दखल घेऊन रुग्णालयासाठी दरवर्षी अनुदानामध्ये वाढ करून दिली. ३२ खाटांचे एनएनसीयू, एनआरसी, अत्याधुनिक रक्तपेढी, औषधी भांडार, बाह्यरुग्ण विभागाचा कॉर्पोरेट लुक इत्यादीकरिता आवश्यक असणारे अनुदान राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आले. रुग्णालयाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी डॉ. खेडीकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली डागा रुग्णालयाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श निर्माण केला.
वर्षभरात १४ हजार ९३७ यशस्वीरीत्या प्रसुती
रुग्णालयात नवनवीन प्रकल्प रुग्णांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहेत. आय.पी.एच.एस., हिरकणी कक्ष, आयुष, अर्श क्लिनिक या बरोबरच बीईमॉक, सीईमॉक, सॅब, एमटीपी, बीएमडब्ल्यू मॅनेज्मेन्ट आदी प्रशिक्षण उत्कृष्टपणे राबविले जातात त्याचेच फलित म्हणून २०१० साली संस्थेला उत्तम प्रशिक्षण संस्था म्हणून पुरस्कार मिळाला, तसेच रुग्णांना गुणवत्तापूर्वक सेवा दिल्यामुळे रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे २०१३-२०१४ या वर्षात १४,९३७ प्रसूती यशस्वीरीतीने करून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. त्याकरिता ११ जुलै २०१४ ला राज्यमंत्री यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. २०१३-२०१४ मध्ये मातामृत्यूचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यास व नवजात अतिदक्षता विभागात सुद्धा नवजात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे.
रुग्णालय
‘आयएसओ’ व्हावे
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय नागपूर या संस्थेला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याने मला अत्यंत आनंद होत आहे. या रुग्णालयात २००६ पासून कार्यरत आहे. रुजू झाल्यावर अनेक अडचणी समोर होत्या पण सर्व अधिकारी, परिचारिका, तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग, तसेच प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे सर्व अडचणींवर मात करून आज डागा रुग्णालय प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. परिश्रमाची फलश्रुती म्हणूनच रुग्णालयास ५०० खाटांचा दर्जा मिळाला आहे. रुग्णसंख्येत व प्रसुती संख्येत सुद्धा लक्षणीय वाढ झालेली आहे. रुग्णांना सर्व सेवा मिळत असल्याने हे रुग्णालय ‘आयएसओ’ व्हावे तसेच ५०० खाटांचे स्त्री जिल्हा रुग्णालय व्हावे हा मानस आहे.
डॉ. वैशाली पूर्णचंद्रबाबू खेडीकर
वैद्यकीय अधीक्षक, डागा स्मृती शासकीय रुग्णालय