दोन शेतकऱ्यांच्या हस्ते झाले अन्न व नागरी पुरवठा व सांसदीय कामकाज मंत्र्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 08:30 PM2017-12-22T20:30:13+5:302017-12-22T20:31:08+5:30
‘3 वर्षांचा सार्थक प्रवास, सर्वांगीण विकास’ या पुस्तिकेचे प्रकाशन शुक्रवारी विधानभवन परिसरात दोन शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न व नागरी पुरवठा मंत्री व संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी तीन वर्षांच्या कलावधीत अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून राज्यात विविध विकास योजना राबविल्या. याचा आढावा असलेल्या ‘3 वर्षांचा सार्थक प्रवास, सर्वांगीण विकास’ या पुस्तिकेचे प्रकाशन शुक्रवारी विधानभवन परिसरात दोन शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तर सर्वसामान्य नागरिकांना थेट तक्रारी, समस्या मांडता याव्यात यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘गिरीश बापट अॅप’चे लोकार्पण ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य जगन्नाथ बोरकुटे व नागपूर जिल्ह्यातील अंबाडा येथील नानाजी बेले यांच्या हस्ते गिरीश बापट यांनी या पुस्तिकेचे प्रकाशन केले. पत्रकार दिनेश सातपुते यांच्याहस्ते गिरीश बापट अॅपचे लोकार्पण करण्यात आले.
गिरीश बापट यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग कार्यक्षम करताना सार्वजनिक वितरण व्यवस्था निर्दोष आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच सर्वसामान्य ग्राहकांच्या हक्क आणि हिताचे रक्षण करण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात वर्षांचा सार्थक प्रवास, सर्वांगीण विकास या पुस्तिकेत आढावा घेण्यात आला आहे.
सामान्य माणूस हा माझा ‘देव’ : बापट
मंत्री असलो तरी सामान्य माणूस हे माझे अराध्य दैवत आहे. मी सामाजिक जीवनात गेली ४० वर्षे कार्यरत आहे. सामान्य माणूस हा माझा ‘देव’ आहे. त्यांना माझ्याशी सहज संपर्क साधता यावा, तक्रारी व समस्या मांडता याव्यात. यासाठी ‘गिरीश बापट अॅप’ तयार करण्यात आले. यामुळे नागरिकांना माझ्याशी थेट संपर्क साधता येईल, असा विश्वास गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केला.