नागपूर जिल्हा मानव विकास अहवालाचे प्रकाशन
By Admin | Published: March 9, 2016 03:25 AM2016-03-09T03:25:11+5:302016-03-09T03:25:11+5:30
नागपूर जिल्ह्याच्या पहिल्या मानव विकास अहवालाचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज बचत भवनात झाले.
नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या पहिल्या मानव विकास अहवालाचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज बचत भवनात झाले.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, विद्यापीठाच्या एमबीए विभागाचे प्रमुख डॉ. विनायक देशपांडे, तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण, डॉ. अंजली कुळकर्णी, निखिल अटाळे, यशदाचे प्रतिनिधी डॉ. अतुल नौबदे उपस्थित होते.
मानव विकासाची संकल्पना ही गतिशील व बहुआयामी आहे. मानव विकास हा आर्थिक विकासापेक्षा भिन्न असून आरोग्य व शिक्षण या क्षेत्रातील प्रगतीद्वारे मानव विकास साधता येतो हे आता मान्य झाले आहे. २०१२ साली महाराष्ट्र राज्याचा दुसरा मानव विकास अहवाल यशदा पुणे यांनी तयार केला. या अहवालामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक काढला आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, नीती आयोग, भारत सरकार व नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध जिल्ह्यांचे मानव विकास अहवाल तयार करण्यात येत आहेत. नागपूर जिल्ह्याचा मानव विकास अहवाल यशदा पुणे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी तयार केलेला आहे.
नागपूर जिल्ह्याच्या या पहिल्या मानव विकास अहवालात लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक निर्देशाकांचे उपलब्ध सांख्यिकी माहिती व प्राथमिक सर्वेक्षणाच्या आधारे तालुकानिहाय विश्लेषण करण्यात आलेले आहे. या अहवालात नागपूर जिल्ह्यातील मानव विकासाच्या प्रगतीचे तालुकानिहाय विश्लेषण, नागपूर जिल्ह्यातील मानव विकासाच्या तफावतीची कारणमीमांसा, नागपूर जिल्ह्यातील तालुकांच्या मानव विकासाच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचविणे या बाबींच्या अनुषंगाने संख्यात्मक व गुणात्मक विश्लेषण केलेले आहे.
या अहवालामध्ये प्रस्तावना, लोकसंख्या, पायाभूत सुविधा, उत्पन्न, आरोग्य, शिक्षण, निवास, पाणीपुरवठा व मलनि:सारण, लिंग समभाव, प्रशासन व पुढील वाटचाल ही प्रकरणे असून त्या संबंधी मानव विकासाचे तालुकानिहाय विश्लेषण करण्यात आले आहे. या अहवालात जिल्ह्यातील तालुकानिहाय मानव विकासाची स्थिती सुधारण्यासाठी राज्य, जिल्हा व मानव विकास आयुक्तालय या तिन्ही स्तरावर शिफारशी सुचविण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)