राहायला पक्की घरे, नाेकरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:59+5:302021-06-16T04:11:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : सावनेर तालुक्यात कन्हान नदीवर काेच्छी बॅरेजची निर्मिती केली जात आहे. त्यासाठी नदीकाठी असलेल्या काेच्छी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : सावनेर तालुक्यात कन्हान नदीवर काेच्छी बॅरेजची निर्मिती केली जात आहे. त्यासाठी नदीकाठी असलेल्या काेच्छी गाव हटविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत गावातील पाच घरे जमीनदाेस्त केल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंताेष निर्माण झाला आहे. त्यामुळे आधी राहायला पक्की घरे आणि हाताला काम नाेकरी द्या, अशी मागणी प्रकल्पग्रस्त तरुणांनी केली असून, आंदाेलनाचा इशाराही दिला आहे.
यासंदर्भात प्रकल्पग्रस्त तरुणांनी सांगितले की, ही समस्या साेडविण्यासाठी या विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनिता पराते व खापा (ता. सावनेर) येथील अभियंता सुहास खाेब्रागडे यांना वारंवार निवेदने व तक्रारी देऊन समस्या सांगण्यात आली. परंतु, या विभागातील अधिकारी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकायला तयार नाहीत. त्यातच ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला (१० जून) काेणतीही पूर्वसूचना न देता काेच्छी येथील घरे पाडण्यात आली. ही बाब अन्यायकारक आहे, असा आराेपही तरुणांनी केला आहे.
आपला काेच्छी बॅरेजला विराेध नाही. परंतु, प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेत त्या साेडवाव्या. अधिकारी गावातील काही नेत्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करीत असल्याचा आराेपीही तरुणांनी केला. प्रशासनाने १० जून राेजी पाेलीस बंदाेबस्तात सायंकाळी घरे पाडण्याची कारवाई केली. यात प्रकल्पग्रस्तांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले. प्रशासनाने आम्हाला राहायला आधी पक्की घरे तसेच राेजगारासाठी कायमस्वरुपी नाेकरी द्यावी, अशी मागणी गौतम भैसारे, सुमित भैसारे, प्रज्ज्वल भैसारे, कल्याणी भैसारे, जय कोचे, लोकेश जांभूळकर, यश बागडे, रितिक करवाडी, महेंद्र तवले, समीर भंडारे, अपूर्व नंदेश्वर, हिमांशू भंडारे, प्रणय जांभूळकर या प्रकल्पग्रस्त तरुणांनी केली असून, ही मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदाेलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.