रुग्णांच्या आहारातून पोळी गायब
By admin | Published: August 23, 2015 02:55 AM2015-08-23T02:55:14+5:302015-08-23T02:55:14+5:30
नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी रुग्णांना मोजकाच आहार पुरवला जात असल्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू आहे.
मेडिकलमधील रुग्णांना मोजकाच आहार : कर्मचाऱ्यांच्या संख्येवर ठरते पोळ्यांचे ‘गणित’
लोकमत विशेष
सुमेध वाघमारे नागपूर
नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी रुग्णांना मोजकाच आहार पुरवला जात असल्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, आता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर रुग्णांचा आहार अवलंबून आहे. ज्या दिवशी पूर्ण कर्मचारी हजर असतील त्याच दिवशी भाजी, पोळी, वरण-भात असा आहार मिळतो आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असल्यास आहारातून पोळी गायब तर कधी केवळ एकाच पोळीवर रुग्णांना समाधान मानावे लागते.
आजाराला लवकर आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाला योग्य उपचारासोबत योग्य आहाराची गरज असते. रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. या उद्देशानेच मेडिकलमध्ये पाकगृहाची सुरुवात झाली. सध्याच्या स्थितीत मेडिकलसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय व टीबी वॉर्डातील असे एकूण सुमारे ८०० रुग्णांना नाश्त्यासह दोन वेळचे जेवण दिले जाते. रुग्णांच्या जेवणात तूर किंवा मसुरीचे वरण, भात, भाजी, पोळी असा नेहमीचा मेनू ठरला आहे. रुग्णांचा आहार आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात यावा, असा नियम आहे. मात्र, त्याचे किती पालन होते हे रोजच्या जेवणाच्या पदार्थातून दिसून येते. विशेष म्हणजे, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा ‘समाधानकारक’ असा शेरा मिळाल्यावरच पाकगृहात तयार झालेला पदार्थ रुग्णांपर्यंत पोहचतो. परंतु रुग्णांना देण्यात येणारा आहार पौष्टिक तर नाहीच उलट मोजकाच असला तरी ‘समाधानकारक’ शेरा मारणे सुरू आहे.
३२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
मेडिकलच्या पाकगृहासाठी ५२ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना तब्बल ३२ पदे रिक्त आहेत. २० कर्मचाऱ्यांच्या भरोशावर मेडिकलचे पाकगृह कसेबसे सुरू आहे. पाकगृहात दोन पाळीत आहार तयार केला जातो. पूर्वी प्रत्येक पाळीत २६ कर्मचारी असायचे परंतु वेळोवेळी रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने आता एका पाळीत केवळ १० कर्मचारी असतात. यात साप्ताहिक सुटी, तर कोणी रजेवर गेल्यास याचा सर्वाधिक प्रभाव पोळ्या तयार करण्यावर होतो. जास्त कर्मचारी सुटीवर असल्यास त्या दिवशी पोळ्याच तयार होत नाही तर कमी कर्मचारी असल्यास त्या दिवशी प्रत्येक रुग्णाला एक पोळी मिळेल अशीच व्यवस्था असते.
प्रति रुग्णामागे शासन देते केवळ २५ रुपये
प्रति रुग्णाच्या नाश्त्यासह दोन वेळेच्या आहारावर शासन केवळ २५ रुपये खर्च करते. रुग्णालय प्रशासनाला प्रति रुग्णामागे साधारण ५० रुपये खर्च येतो. आधीच रुग्णालयात औषधांपासून इतर सर्व वस्तूंची चणचण असताना हा खर्च पेलवणे प्रशासनाला अवघड जात आहे. यामुळेच रुग्णाला शेंगदाण्याचा लाडू आणि उकडलेले अंडे देणे बंद झाले आहे. वरण-भात व जास्तीत जास्त वेळा भोपळ्याची भाजी तेवढीच काय रुग्णाच्या नशिबी आली आहे.