पुलवामा हल्ला म्हणजे भारताच्या पाठीत केलेला वार : उज्ज्वल निकम यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:37 PM2019-03-08T22:37:29+5:302019-03-08T22:40:43+5:30
पुलवामा हल्ला हा भारताच्या पाठीत केलेला वार आहे. पाकिस्तान अशा हल्ल्यांना नेहमीच मदत करीत आला आहे. त्यामुळे भारताने ठोस पुरावे जगापुढे मांडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा करायला पाहिजे, असे मत विविध बहुचर्चित फौजदारी खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुलवामा हल्ला हा भारताच्या पाठीत केलेला वार आहे. पाकिस्तान अशा हल्ल्यांना नेहमीच मदत करीत आला आहे. त्यामुळे भारताने ठोस पुरावे जगापुढे मांडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा करायला पाहिजे, असे मत विविध बहुचर्चित फौजदारी खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
निकम यांनी शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित ‘जस्टा कॉजा’ वार्षिक परिषदेमध्ये मार्गदर्शन केले. दहशतवादी हल्ल्यांमुळे देशात नेहमीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अशी प्रकरणे हाताळताना काळजी घ्यावी लागते. गुन्हा सिद्ध करण्यासाठी परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी जोडणे आवश्यक असते. त्यामुळे पुलवामा हल्ला प्रकरणात प्रत्येक पाऊल सावधपूर्वक उचलावे लागणार आहे. तर्कसंगत पुरावे मांडले तरच पाकिस्तानचा खरा चेहरा उघड होईल असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार यांनी प्रास्तावित केले.
महिलांनी अधिकारांसाठी लढावे - वासंती नाईक
मुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती वासंती नाईक यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी ‘महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध’ विषयावर मार्गदर्शन केले. महिलांची पूजा करणे भारतीय संस्कृती आहे. असे असताना महिलांवर शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचार केले जातात. महिलांच्या संरक्षणासाठी कायदे आहेत. त्यामुळे महिलांनी स्वत:चे अधिकार मिळविण्यासाठी नि:संकोचपणे न्यायालयाचे दार ठोठवावे असे त्यांनी सांगितले.