पुणे पोलिसांची कारवाई ही वकिलांना घाबरवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 10:49 PM2018-04-18T22:49:36+5:302018-04-18T22:53:57+5:30
कोणत्या वकिलाने कुणाचे वकिलपत्र घ्यावे, हा त्याचा अधिकार आहे. केवळ आदिवासी पीडितांचे आणि नक्षलवादाशी संबंधित आरोप असलेल्यांचे वकीलपत्र घेतले म्हणून कुणी नक्षलवादी होत नाही. तेव्हा पुणे पोलिसांनी अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या घरावर टाकलेल्या धाडीची कारवाई ही संपूर्ण वकिलांनाच घाबरवण्याचा प्रयत्न आहे, असे स्पष्ट करीत नागपुरातील विविध वकील संघटनांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोणत्या वकिलाने कुणाचे वकिलपत्र घ्यावे, हा त्याचा अधिकार आहे. केवळ आदिवासी पीडितांचे आणि नक्षलवादाशी संबंधित आरोप असलेल्यांचे वकीलपत्र घेतले म्हणून कुणी नक्षलवादी होत नाही. तेव्हा पुणे पोलिसांनी अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या घरावर टाकलेल्या धाडीची कारवाई ही संपूर्ण वकिलांनाच घाबरवण्याचा प्रयत्न आहे, असे स्पष्ट करीत नागपुरातील विविध वकील संघटनांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ वकील संघटनांच्यावतीने १९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जिल्हा न्यायालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे.
डेमोक्रेटिक अॅडव्होकेट असोसिएशन कॉन्स्टीट्युशन अॅक्शन (डाका) , आॅल इंडिया लॉयर्स असोसिएशन इंडियन असोसिएशन आॅफ लॉयर्स कास्ट ट्रायबल लॉयर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषद घेऊन या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी अॅड. संदीप नंदेश्वर म्हणाले, अॅड. सुरेंद्र गडलिंग हे पुणे येथील एल्गार परिषदेत ना वक्ता होते, ना श्रोत्यांमध्ये होते. अशा वेळी त्यांच्यावरील कारवाई ही द्वेषपूर्ण असून कोरेगाव भीमा प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न आहे.
या धाडीमध्ये कुठलेही आक्षेपार्ह साहित्य सापडलेले नाही. त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह असलेले त्यांच्या न्यायालयीन केसेसची प्रकरणे, मुलांचे शैक्षणिक साहित्य आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले. या साहित्याचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे ते तातडीने परत करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रपरिषदेत अॅड. तरुण परमार, अॅड. अनिल काळे, अॅड. विशाखा मेश्राम, अॅड. एस.टी. गोडबोले अॅड. सुरेश नितनवरे, अॅड. एस.पी. टेकाडे, अॅड. राहुल साबळे, शिशुपाल झोडापे आदींचा समावेश होता.
वकिलांमध्ये असुरक्षिततेची भावना
या पत्रपरिषदेला डिस्ट्रीक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल हेही आवर्जून उपस्थित होते. आपण व्यक्तिगतरीत्या उपस्थित असल्याचे स्पष्ट करीत ते म्हणाले, २०० पोलीस एका वकीलाच्या घरी जाणे हे योग्य नाही. कोणत्या वकिलाने कुणाचे वकिलपत्र घ्यावे, हा त्याचा अधिकार आहे. एका विशिष्ट लोकांचे वकिलपत्र घेत असल्याने ते त्यांचे समर्थक आहेत, असा त्याचा अर्थ काढणे योग्य नाही. या कारवाईमुळे वकिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असे माझे व्यक्तिगत मत असल्याचे अॅड. जयस्वाल यांनी स्पष्ट केले.