नागपूरच्या गांधीबागेतील हॉटेलमध्ये धाडसी चोरी :पुण्याच्या व्यापाऱ्याचे ११ लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 08:03 PM2019-05-06T20:03:00+5:302019-05-06T20:03:43+5:30
गांधीबागमधील हॉटेलमध्ये थांबलेल्या पुण्याच्या एका व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड चोरीला गेली. हॉटेलमध्ये कामाला असलेल्या कर्मचाऱ्यानेच ती चोरली असावी असा संशय असून, तहसील पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गांधीबागमधील हॉटेलमध्ये थांबलेल्या पुण्याच्या एका व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड चोरीला गेली. हॉटेलमध्ये कामाला असलेल्या कर्मचाऱ्यानेच ती चोरली असावी असा संशय असून, तहसील पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश जुगलचंद सेठीया (वय ५८) हे पुणे-मुंबई मार्गावरील बोकोडी (पुणे) येथील रहिवासी आहेत. त्यांचा स्क्रॅपचा मोठा व्यवसाय असून, व्यवसायाच्या निमित्ताने ते नेहमीच वेगवेगळ्या शहरात जातात. गेल्या पाच महिन्यांपासून ते आलटून-पालटून नागपुरात येतात. नेहमीप्रमाणे गेल्या आठवड्यात ते नागपुरात आले. सेंट्रल एव्हेन्यू, गांधीबागमधील हॉटेल इंडियासनच्या रूम नंबर ४०५ मध्ये त्यांचा मुक्काम होता. ३ मे ते ५ मेच्या दरम्यान ते व्यवसायाच्या निमित्ताने हिंगणा येथे गेले होते. त्यांचे साहित्य रूममध्येच होते. या तीन दिवसांत त्यांच्या एकाने रूमचे दार बनावट चावीने उघडून रूममध्ये ठेवलेल्या प्रवासी बॅगमधून ११ लाखांची रोकड चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सेठीया यांनी हॉटेल प्रशासनाकडे तक्रार केली. हॉटेल प्रशासनाने तहसील ठाण्यात सूचना दिली. सेठीया यांची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर सहायक निरीक्षक गायकवाड यांनी रूमबॉयसह अनेकांकडे विचारणा केली. चोरीचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले.
बेपत्ता वेटरवर संशय
साफसफाई करण्याच्या बहाण्याने रूमच्या दाराचे कुलूप काऊंटरवरील चावीने उघडून हॉटेलचा एखादी कर्मचारीच रूममध्ये शिरला असावा आणि त्यानेच ही रक्कम चोरली असावी, असा संशय आहे. दोन दिवसांपासून हॉटेलमधील एक वेटर कामावर आलेला नाही. तो वेटर बाहेरगावचा रहिवासी असून, रक्कम चोरीला जाणे आणि त्याचे कामावर न येणे, हा धागा पकडून चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस बेपत्ता वेटरचा शोध घेत आहेत.