यशच्या मारेकऱ्याला फाशीचीच शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 09:24 PM2018-05-07T21:24:03+5:302018-05-07T21:24:16+5:30
दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ११ वर्षीय साहील ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून करणारा क्रूरकर्मा आरोपी संतोष रामदास काळवे (२५) याला फाशीचीच शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी सरकार पक्षाने सोमवारी सत्र न्यायालयाला केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ११ वर्षीय साहील ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून करणारा क्रूरकर्मा आरोपी संतोष रामदास काळवे (२५) याला फाशीचीच शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी सरकार पक्षाने सोमवारी सत्र न्यायालयाला केली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांच्यासमक्ष खटल्यावर सुनावणी पूर्ण झाली असून त्यांनी आरोपी काळवेला खंडणीसाठी अपहरण (भादंवि कलम ३६४-अ), खून (भादंवि कलम ३०२) व पुरावे नष्ट करणे (भादंवि कलम २०१) या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. सोमवारी सरकार व बचाव पक्षाने आरोपीच्या शिक्षेवर युक्तिवाद केला. सरकार पक्षातर्फे अॅड. विजय कोल्हे यांनी बाजू मांडली. आरोपी काळवे यशच्या ओळखीचा होता. काळवेने याचा फायदा घेऊन खंडणी वसुलीसाठी यशचे अपहरण केले व त्यानंतर त्याचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून केला. वैद्यकीय तपासणीत यशच्या शरीरावर २२ जखमा आढळून आल्या होत्या. यश आरोपीपुढे असहाय होता. तसेच, आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेऊन यशचा विश्वासघात केला. हे प्रकरण दुर्मीळ प्रकारात मोडते. त्यामुळे आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार मागणी कोल्हे यांनी केली. बचाव पक्षाचे वकील संतोष चांडे यांनी आरोपी तरुण असल्याने व तो सुधारण्याची शक्यता लक्षात घेता त्याला फाशीची शिक्षा देणे योग्य होणार नाही असा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिक्षेवरील निर्णय बुधवारपर्यंत राखून ठेवला. त्यामुळे आरोपीला कोणती शिक्षा होते हे बुधवारी स्पष्ट होणार आहे.
ही घटना ११ जून २०१३ रोजी घडली होती. त्यावेळी यश व आरोपी खापरी येथे राहात होते. आरोपी मूळचा दापोली (काळवे), ता. मालेगाव, जि. वाशीम येथील रहिवासी आहे. तो खापरी येथे भाड्याच्या खोलीत राहून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करीत होता. परंतु, त्याने वस्तीतील लोकांना तो पोलीस असल्याचे सांगितले होते. यश पाचव्या वर्गात शिकत होता. त्याचे वडिलांचा सलूनचा व्यवसाय आहे. आई गृहिणी असून बहीण शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी यश घराजवळच्या परिसरात खेळत होता. दरम्यान, आरोपीने त्याचे अपहरण केले. यशला आरोपीच्या मोटरसायकलवर बसून जाताना दोन लहान मुलांनी पाहिले होते. त्यानंतर दुसºया दिवशी मिहान परिसरात यशचा मृतदेह आढळून आला.
नऊ परिस्थितीजन्य पुरावे सादर
सरकार पक्षाने न्यायालयात २७ साक्षीदार तपासले. तसेच नऊ परिस्थितीजन्य पुरावे सादर केले. त्यात यशला शेवटचे आरोपीसोबत पाहिले जाणे, त्यानंतर काही वेळातच आरोपीच्या बयानावरून यशचा मृतदेह आढळून येणे, आरोपीच्या कपड्यांवरील चिखल व यशचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणचा चिखल सारखा आढळून येणे, खंडणीचा मोबाईल कॉल करण्यात आला त्या क्रमांकाचे सीम कार्ड आरोपीच्या खोलीतून जप्त होणे, यशच्या वडिलांना आलेला खंडणीचा मोबाईल कॉल, गुन्ह्याचा हेतू, आरोपीची गुन्हेगारी प्रवृत्ती, थंड डोक्याने कट रचून गुन्हा करणे इत्यादी पुराव्यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘बच्चन सिंग’ प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार हे प्रकरण दुर्मीळ प्रकारात मोडते असेही सरकारने सांगितले. यशचा खून केल्यानंतर आरोपी घरी आला व त्याने देवाची पूजा केली होती. तसेच, त्याने परिसरात प्रसाद वाटला होता, ही बाबसुद्धा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
२७ जूनला होता यशचा वाढदिवस
२७ जून रोजी यशचा वाढदिवस होता. बोरकर कुटुंबीयांनी यशचा वाढदिवस थाटात साजरा करण्याचे ठरविले होते. परंतु, नियतीला ते मान्य नव्हते. यशच्या खुनानंतर बोरकर कुटुंबीयांवर दु:खाचा पहाड कोसळला.