सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यास शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 09:53 PM2019-05-07T21:53:23+5:302019-05-07T21:55:02+5:30
सत्र न्यायालयाने कर्तव्यावरील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विनय यावलकर यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे आरोपीला दणका बसला. ही घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने कर्तव्यावरील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विनय यावलकर यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे आरोपीला दणका बसला. ही घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
अंकुश विवेक देशमुख (३१) असे आरोपीचे नाव असून तो बडेगाव, ता. सावनेर येथील रहिवासी आहे. धीरज घुले असे सरकारी कर्मचाऱ्याचे नाव असून, ते वीज विभागात तंत्रज्ञ आहेत. पोलीस तक्रारीनुसार, घुले ११ जुलै २०१८ रोजी काही सरकारी कामे आटोपून दुपारी ३ च्या सुमारास चारगाव येथे नाश्ता करीत बसले होते. दरम्यान, त्यांना आरोपीने फोन करून माझ्या घरची बंद वीज कधी सुरू करून देतो, अशी विचारणा केली. घुले यांनी नाश्ता झाल्यावर येतो, असे उत्तर दिले. त्यानंतर काही वेळाने आरोपीच घुले यांच्याकडे आला व त्याने घुले यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. तसेच, घुले यांची गच्ची पकडून गालावर थापड मारली व त्यांना खाली ढकलून दिले. घुले यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली व आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. दीपक गादेवार यांनी कामकाज पाहिले.